Nagar | महात्मा गांधींचे विचार आत्मसात करुन त्याचे अनुकरण करुया

नगर, (प्रतिनिधी) – देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींनी महत्त्वाचे योगदान दिले. यामुळेच त्यांना राष्ट्रपिता’ म्हणूनही ओळखले जाते.
दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते. भारताव्यतिरिक्त, हा दिवस जगभरात ’आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, कारण त्यांना अहिंसावादी स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जात आहे.
गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांचा आत्मसात करून आपल्या जीवनात अनुकरण करूया. त्यांच्या सत्याग्रह आणि अहिंसावादाचा वापर करून आपण समाजातील अन्याय आणि असमानता दूर करूया, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा हमाल पंचायत येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हमाल पंचायत जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष गोविंदराव सांगळे, माथडी पतसंस्था अध्यक्ष रवींद्र भोसले, संजय महापुरे, सतिष शेळके, सचिन ठुबे, मच्छिंद्र गिरी, तबाजी कार्ले, युवराज राऊत, असिफ कादरी आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष अविनाश घुले म्हणाले की, गांधीजींच्या नेतृत्वात भारताने स्वातंत्र्य मिळवले. गांधीजी हे केवळ एक राजकीय नेतेच नव्हते,तर एक समाज सुधारक आणि आध्यात्मिक नेताही होते. त्यांनी जातिभेद, स्त्री समानता आणि ग्रामीण विकास यांच्यासाठी काम केले. त्यांच्या विचारांचा प्रभाव जगभरात पसरला.





