अहिल्यानगर : गेल्या 15 दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील गोहत्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छाप्याचे बजरंग दल व आमदार संग्राम जगताप यांनी स्वागत केले. संपूर्ण शहर व जिल्हा गोहत्या मुक्त करण्यासाठी, कत्तलखाना मुक्त करण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. येत्या काळात शहर व जिल्हा कत्तलखाना मुक्त करण्यासाठी प्रयत्न होतील, असे आमदार जगताप यांनी सांगितले. आमदार जगताप यांनी प्रथमच कत्तलखान्यांवर कारवाईसाठी उघड भूमिका घेतली. त्यांच्यासह बजरंग दलाचे गोरक्षा पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख ऋषिकेश भागवत व कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक ओला यांची भेट घेतली. पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवायांबाबत समाधान व्यक्त करत संपूर्ण जिल्हा गोहत्या मुक्त व कत्तलखाना मुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर बजरंग दलाच्या वतीने महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देऊन झेंडीगेटसह शहराच्या सर्व भागातील अवैध कत्तलखान्याच्या बांधकामांवर कारवाई करून कत्तलखाने भुईसपाट करावेत, अशी मागणी करण्यात आली. आमदार जगताप म्हणाले की, राज्य सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. गोहत्या रोखण्यासाठी गोरक्षक प्रयत्न करत आहेत. त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पोलिस प्रशासनाकडून कारवाया सुरू असून, येत्या काळात जिल्हा व शहर गोहत्या मुक्त, कत्तलखाना मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, प्रसंगी प्राणांची आहुती देऊ, असेही ते म्हणाले.