Nagar | औद्योगिक प्रकल्प नगरसाठी बुस्टर डोस ठरणारः आ. जगताप

नगर, (प्रतिनिधी)- औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी महायुती सरकारने नगरमध्ये 600 एकरच्या जागेसह नव्या एमआयडीसीला परवानगी दिली आहे. त्यामुळे नवे मोठ-मोठी औद्योगिक प्रकल्प नगरमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा प्रकल्प नगरसाठी बुस्टर डोस ठरणार असून मोठ्या प्रमाणात लहान उद्योगांना चालना व रोजगार वाढणार असल्याची माहित आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
महायुतीचे उमेदवार आ. जगताप यांनी नगर विकास यात्रेत इंडस्ट्रीयल इस्टेटमधील उद्योजकांशी संवाद साधून निवडणुकीतील आपली भूमिका मांडली. यावेळी अहमदनगर इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष अरविंद गुंदेचा यांनी आ. जगताप यांचे स्वागत करून सत्कार केला.
यावेळी उपाध्यक्ष निलेश मेहेर, संचालक संतोष बोथरा, मेहुल भंडारी, संतोष बोरा, नितीन पटवा व सतीश बोरा आदींसह इंडस्ट्रीयल इस्टेटमधील उद्योजक उपस्थित होते.
इंडस्ट्रीयल इस्टेट या औद्योगिक वसाहतीचे अनेक प्रश्न व समस्या मांडल्या गेल्या. त्यातील अनेक सोडवल्या आहेत. अंतर्गत रस्ते काँक्रीटचे झाल्याने येथे वर्दळ वाढणार आहे. शहराचा चहूबाजूंनी सर्वांगीण विकास होत असल्याने चांगल्या नागरी सुविधा मिळत असल्याने शहरात लोकवस्ती वाढत आहेत.
या विकासाच्या चाकाची गती वाढवण्यासाठी सर्वांनी एकएक पायडल मारणे आवश्यक आहे. यासाठी या निवडणुकीतून पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन आ. जगताप यांनी केले. प्रास्ताविकात संतोष बोरा यांनी इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये आ. जगताप यांनी केलेल्या कामांची माहिती दिली. नितीन पटवा यांनी आभार मानले.





