Mohammed Shami Responds to Ajit Agarkar : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या निवडीसंदर्भातील वक्तव्याला ठामपणे प्रत्युत्तर दिले आहे. शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले नसल्याचे आगरकर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात म्हटले होते. मात्र, शमीने हे दावे स्पष्टपणे फेटाळून लावत आपण पूर्णपणे तंदुरुस्त असून सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याचे सांगितले. त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या – सध्या शमी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालकडून खेळत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर उत्तराखंडविरुद्धच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शमीने अप्रतिम गोलंदाजी करत पहिल्या डावात 37 धावांत तीन बळी घेतले. सामन्यानंतर ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना आगरकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शमी म्हणाला, “त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या. सर्व काही तुमच्या डोळ्यांसमोर आहे. मी कशी गोलंदाजी करतोय, हे तुम्ही पाहू शकता.” संघ निवडीवर प्रश्नचिन्ह – मोहम्मद शमीच्या या वक्तव्यानंतर संघ निवडीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शमी भारतीय संघाबाहेर आहे. त्याने अखेरचा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्यानंतर कोणत्याही दौऱ्यासाठी त्याची निवड झालेली नाही. मात्र, रणजी ट्रॉफीतील त्याची लय आणि फिटनेस दोन्ही उत्तम असल्याचे दिसत आहे. हेही वाचा – Ranji Trophy 2025 : पृथ्वी शॉ-आर्शिनची धमाकेदार सुरुवात, केरळवर महाराष्ट्राची आघाडी! आगरकर यांचे स्पष्टीकरण आणि शमीची नाराजी – एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमात अजित आगरकर म्हणाले होते, “गेल्या सहा महिन्यांत मी शमीशी अनेकदा बोललो आहे. आम्हाला वाटले की तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. जर तो तंदुरुस्त असता तर चित्र वेगळे असते, पण त्यावेळी तो तयार नव्हता, म्हणून त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी निवडले गेले नाही.” हेही वाचा – Afghanistan vs Pakistan War : धक्कादायक! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार आगरकर यांच्या या वक्तव्याने शमी प्रचंड नाराज झाल्याचे दिसते. त्याने सांगितले की त्याचा फोन नेहमीच सुरू असतो, पण कोणीही त्याच्याशी नीट बोलले नाही. आपण फिटनेसवर सातत्याने काम करत असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) सेंटर ऑफ एक्सलन्समध्येही वेळ घालवला असल्याचे त्याने स्पष्ट केले.