Leopard Sightings – राज्यातील विविध भागांमध्ये बिबट्यांच्या हालचाली वाढल्याच्या घटना समोर येत असतानाच खालापूर तालुक्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाट परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (दि. ११) मध्यरात्री टाटा कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्याच्या बछड्याने रस्ता ओलांडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. बोरघाट परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर असून या भागात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, कॅमेऱ्यात दिसलेला बिबट्या साधारणतः एक वर्षाचा बछडा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घाट माथ्यावरील जंगल परिसरात बिबट्या व त्याची पिल्ले मुक्तपणे फिरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी याच घाट परिसरात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पुन्हा बिबट्याचा वावर आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या परिसरात टाटा कॉलनी, सायमाळ, दत्तवाडी, दस्तुरी, मंकीहिल, गारमाळ व वाघरणवाडी या गावांचा समावेश असून सुमारे साठ ते सत्तर घरांची वस्ती जंगल भागालगत आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावले असून रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडणे, लहान मुलांना घराबाहेर न सोडणे, अन्नपदार्थ उघड्यावर न टाकणे अशा सूचना दिल्या आहेत. खालापूर तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले की, कोणालाही बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.