Leopard captured: पिंपरखेडमध्ये सहा वर्षीय मादी बिबट्या जेरबंद; तीन महिन्यांत तब्बल 37 बिबट्यांना पकडण्यात यश
Leopard captured: गेल्या अवघ्या तीन महिन्यांत पिंपरखेड बीट कार्यक्षेत्रातून एकूण ३७ बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

Leopard captured: शिरूर तालुक्याच्या बेट भागातील पिंपरखेड, जांबूत आणि फाकटे परिसरात बिबट्यांचा वावर अद्यापही कायम असताना, वनविभागाने आपली मोहिमेची गती वाढवली आहे. शुक्रवारी (दि. १३) रात्री आठ वाजेच्या सुमारास पिंपरखेड येथील शेतकरी काळूराम नाथा बराटे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात सहा वर्ष वयाची मादी बिबट्या जेरबंद झाली. या यशामुळे परिसरातील ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
एकापाठोपाठ एक ३७ बिबट्यांचा थरार –
नोव्हेंबर २०२५ मध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात तिघांचा दुर्दैवी बळी गेल्यानंतर वनविभागाकडून या भागात अत्यंत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या अवघ्या तीन महिन्यांत पिंपरखेड बीट कार्यक्षेत्रातून एकूण ३७ बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. एखाद्या लहानशा परिसरातून एवढ्या मोठ्या संख्येने बिबट्या जेरबंद होण्याची ही दुर्मिळ घटना असून, यावरून या परिसरातील बिबट्यांच्या संख्येची दाहकता दिसून येत आहे.
निवारण केंद्रात रवानगी –
शुक्रवारी पकडण्यात आलेल्या मादी बिबट्याला सुरक्षितपणे शिरूर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीत पिंपरखेड परिसरात एकूण १६ पिंजरे कार्यान्वित असून वनविभागाचे पथक २४ तास या भागावर लक्ष ठेवून आहे.
शेतकऱ्यांची चिंता कायम –
सध्या ऊसतोडणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ऊस तोडला गेल्यामुळे बिबट्यांचे नैसर्गिक लपण्याचे ठिकाण नष्ट होत असून, ते अन्न व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे उर्वरित बिबट्यांचाही तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गाकडून होत आहे.
दरम्यान, ही कारवाई सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या सूचनेवरून आणि शिरूरचे वनपरिक्क्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल लहू केसकर, वनरक्षक महेंद्र दाते व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वी केली.





