Satara News : बिबट्याचा बछडा लपला भेळेच्या टपरीत; मलकापूरमधील लोकवस्तीत वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन
Satara News : मलकापूरातील तामजाईनगरमध्ये शुक्रवारी सकाळी बिबट्याच्या चार ते पाच महिन्याच्या बछड्याचा काही कुत्र्यांनी पाठलाग केला. त्यावेळी हा बछडा लोकवस्तीत घुसला. एका रिकाम्या प्लॉटमध्ये त्याने धूम ठोकली.

कराड : कुत्र्यांनी पाठलाग केल्यांनतर जीव वाचवण्यासाठी लोकवस्तीत धाव घेऊन भेळपुरीच्या रिकाम्या टपरीत लपलेल्या बिबट्याच्या बछड्याला वन विभागाने ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवत ताब्यात घेतले. कराडजवळ मलकापुरात शुक्रवारी सकाळी ही थरारक घटना घडली. मलकापूरातील तामजाईनगरमध्ये शुक्रवारी सकाळी बिबट्याच्या चार ते पाच महिन्याच्या बछड्याचा काही कुत्र्यांनी पाठलाग केला. त्यावेळी हा बछडा लोकवस्तीत घुसला. एका रिकाम्या प्लॉटमध्ये त्याने धूम ठोकली.
रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी हा प्रकार पहिल्यानंतर वन विभागाला याची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील, वनपाल जाधव, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, कैलास सानप, भारत पाटील, गणेश काळे, रोहित कुलकर्णी यांच्यासह रेस्क्यू टीमचे सदस्य त्याठिकाणी दाखल झाले. रिकाम्या प्लॉटमधील झूडपात बछड्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी तो सापडला नाही. याचवेळी त्या प्लॉटमध्ये असलेल्या भेळच्या रिकाम्या टपरीत हालचाल जाणवल्याने त्याठिकाणी पिंजरा लावण्यात आला. वनाधिकारी तसेच रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करुन बछड्याला पिंजऱ्यात कैद केले. त्यानंतर त्याला सुरक्षित वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.




