Leopard Cub Dead: बिबट्यांच्या झुंजीत बछड्याचा बळी? राजुरी परिसरात भीतीचे सावट; वनविभागाकडून तपास सुरू

राजुरी परिसरात बिबट्यांच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत; वनविभागाच्या पथकाकडून परिसरात गस्त वाढवण्याची मागणी.
Leopard Cub Dead – हिवरमळा शिवारात गुरूवारी (दि. २२) सकाळी नऊच्या सुमारात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जालिंदर दगडू औटी या शेतकऱ्याच्या शेतात हा मृतदेह आढळला असून, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृत बछड्याला ताब्यात घेतले आहे.
या घटनेची माहिती शेतकरी जालिंदर औटी यांनी वनविभागाला दिली असता, वनरक्षक अनिल सोनवणे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक तपासणीत मृत बिबट्याचे दात, पंजे आणि इतर सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे दिसून आले आहे. हा बछडा मादी जातीचा असून, त्याचे वय अंदाजे दोन ते तीन महिने आहे.
बिबट्या झालेल्या आपापसांतील भांडणात या बछड्याचा मृत्यू झाला असावा, असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, या मृत बछड्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होईल. राजुरी परिसरात बिबट्यांचा वावर मोठा असल्याने या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.





