Tiger Baji : देवीच्या यात्रेला दरवर्षी येतोय चक्क वाघ; ‘सेनापती’नंतर यंदा ‘बाजी’ची ‘एण्ट्री’
Tiger Baji :

Tiger Baji : चांदोली राष्ट्रीय उद्यानअंतर्गत आंबा वन परिक्षेत्रात उदगिरी (ता. शाहूवाडी) हे बफर क्षेत्रातील महत्त्वाचे गाव आहे. येथील काळम्मादेवीच्या धुलिवंदनादिवशी भरणार्या यात्रेवेळी दरवर्षी वाघ हजेरी लावत असल्याची श्रद्धा आहे.
गेल्या दोन वर्ष वन विभागाला येथे वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्याने त्या श्रद्धेला बळकटी मिळाली होती. मात्र, यंदा या यात्रेवेळी ‘बाजी’ नावाचा नर वाघ मंदिर परिसरात वावरतानाचे फोटोच कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाले आहेत.
उदगिरी हे सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले गाव असून जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे मानव आणि वन्यजीव यांचे सहअस्तित्व अनेक वर्षांपासून पहायला मिळते. येथे काळम्मादेवीचे प्राचीन मंदिर असून दरवर्षी धुलीवंदन दिवशी येथील यात्रा भरते. यात्रेत हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी होत असल्याने वनक्षेत्राच्या सुरक्षेच्यादृष्टीने वन्यजीव विभाग विशेष दक्षता घेतो. गस्त पथके, ट्रॅप कॅमेरे आणि सतत निरीक्षण यांद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जाते. श्रद्धा आणि सुरक्षा यांचा समतोल राखत वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली जाते.
उदगिरीतील काळम्मादेवी मंदिराचे पुजारी नेहमी एक श्रद्धापूर्ण गोष्ट सांगतात. उदगिरी गावाला वाघ नवीन नाही. त्यांच्या मते, गत अनेक वर्षे मंदिर परिसरात वाघाचे दर्शन होत आले आहे. विशेष म्हणजे देवीच्या यात्रेच्या काळातही वाघ मंदिर परिसरात येतो, अशी त्यांची ठाम श्रद्धा आहे.
मात्र, ही केवळ अख्यायिका नसून, वन्यजीव विभागाच्या नोंदींमुळे आता त्याला वस्तुनिष्ठ आधारही मिळाला आहे. 2024 आणि 2025 मध्ये झालेल्या यात्रेदरम्यान मंदिर परिसरात ‘सेनापती’ या नर वाघाचे ताजे ठसे आढळून आले होते. वनकर्मचार्यांनी त्या ठशांची नोंद घेऊन त्याची खातरजमा केली होती.
याशिवाय, नुकत्याच पार पडलेल्या यात्रेवेळी कोयना अभयारण्य परिसरातील ‘बाजी’ या वाघाचे उदगिरी परिसरात ट्रॅप कॅमेरामध्ये स्पष्ट चित्रण झाले आहे. हा वाघ उदगिरी परिसरात येऊन गेल्याचे पुरावे मिळाल्याने पुजार्यांच्या श्रद्धेला पुन्हा एकदा बळकटी मिळाली आहे.
सह्याद्रीच्या जैवविविधतेचे जिवंत उदाहरण
मानव आणि वाघ यांच्यातील नातेसंबंध हा अनेकदा संघर्षाचा विषय ठरतो. मात्र, उदगिरीत तो सहअस्तित्वाच्या रूपात दिसून येतो. येथे श्रद्धा, परंपरा आणि वन्यजीव संवर्धन यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो.
देवीच्या यात्रेला वाघाचे आगमन ही स्थानिकांसाठी भीतीची नव्हे, तर निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्याची जाणीव करून देणारी घटना आहे. उदगिरीतील काळम्मादेवीची यात्रा आणि त्यानिमित्ताने नोंदवले गेलेले वाघांचे अस्तित्व हे सह्याद्रीच्या जैवविविधतेचे जिवंत उदाहरण आहे.
वन्यजीव विभागाच्या सतर्कतेमुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे उदगिरी येथे मानव आणि वन्यजीव यांच्यातील समतोल अबाधित राखला जात आहे. श्रद्धा आणि विज्ञान, परंपरा आणि संरक्षण या सर्वांचा सुंदर मेळ उदगिरीच्या भूमीत दरवर्षी अनुभवायला मिळतो.
-तुषार चव्हाण (क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प)
उदगिरी : यात्रेवेळी परिसरात वावरणारा ‘बाजी’ हा नर वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला.





