Leopard News – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांचा संचार पुन्हा एकदा वाढत असतानाच, पिंपरखेड येथे मागील वर्षभरापासून पशुधनावर हल्ले करणाऱ्या आणि वनविभागाच्या पिंजऱ्याला वारंवार चकवा देणाऱ्या एका तीन वर्षीय नर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. पिंपरखेड येथील आंबेवाडी हा परिसर बिबट्यांचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी शिवाजी देवराम वरे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अखेर अडकला. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, जेरबंद बिबट्याला उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले आहे. ही कारवाई सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या सूचनेवरून आणि शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक लहू केसकर व वनसेवक महेंद्र दाते यांच्या पथकाने केली. शिरूरच्या पूर्व भागात बिबट्यांची संख्या मोठी असून नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभाग सतर्क झाले आहे. आत्तापर्यंत या परिसरात सुमारे ४१ बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. सध्या ऊसतोडणीचा हंगाम संपल्याने बिबट्यांचा मुक्त संचार वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. “ऊसतोडणीचा हंगाम संपला असल्याने अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे मुक्तपणे बाहेर फिरू शकतात. या आधीच्या काळात या परिसरात सुमारे ४१ बिबटे वनविभागाने जेरबंद केले आहेत. या भागात वनविभागाची टीम रात्रदिवस कार्यरत राहून कारवाई करत आहे. नागरिकांनी काळजी घेऊन बिबट्या निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाला कळवणे गरजेचे आहे. आवश्यक त्या सर्व ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करू.” – स्मिता राजहंस, सहायक वनसंरक्षक, जुन्नर विभाग