Lemon Prices – उन्हाळ्याच्या कडाक्यात लिंबाचे दर झपाट्याने वाढले आहेत. शहरात एका लिंबासाठी तब्बल १० रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे लिंबूपाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, आवक कमी झाल्याने दरांनी उच्चांक गाठला आहे. मोशी येथील बाजारात लिंबांचा पुरवठा मर्यादित आहे. घाऊक बाजारात दर १०० ते १२५ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात हेच दर १५० ते १७५ रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना लिंबू मोजून घ्यावे लागत आहेत. विविध जिल्ह्यातून येणारी आवक कमी झाली आहे. काही प्रमाणात आंध्र प्रदेशातून लिंबे येत आहेत. ही लिंबे आकाराने मोठी आहेत. रसाळ असल्याने मागणी जास्त आहे. मात्र, वाहतूक खर्च वाढल्याने त्यांचे दरही जास्त आहेत. उन्हाळा यंदा लवकरच तीव्र झाला आहे. फेब्रुवारीपासूनच उकाडा वाढला आहे. तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत नागरिक लिंबूपाण्याकडे वळले आहेत. परंतु वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना अडचण निर्माण झाली आहे. लिंबूपाणी हे उन्हाळ्यातील आरोग्यदायी पेय मानले जाते. शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. ’व्हिटॅमिन सी’ मुळे प्रतिकारशक्ती वाढते. शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे मागणी कायम आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पुढील काही दिवस दर कमी होण्याची शक्यता कमी आहे. आवक वाढल्याशिवाय दर नियंत्रणात येणार नाहीत. त्यामुळे सध्या तरी लिंबू ‘महागडे’च राहणार आहेत. एकूणच काय तर, उन्हाच्या झळांसोबत लिंबाच्या दरांनीही नागरिकांना घाम फोडला आहे. सामान्यांच्या दैनंदिन जीवनातील साधा लिंबूही आता महागडे ठरत आहे.