प्रभात वृत्तसेवा कामशेत – शहरातील इंद्रायणी कॉलनीत गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा थेंबही न आल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे घरगुती कामांपासून ते सणासुदीच्या तयारीपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम झाला आहे. पाण्यासाठी नागरिकांना महागडे टँकर विकत घेऊन पाणी आणावे लागत आहे.इंद्रायणी कॉलनीसह पंचशील कॉलनी, गरुड कॉलनी, देवराम कॉलनी, आदर्श कॉलनी या परिसरात पाणीपुरवठा सुरुवातीपासूनच अनियमित आहे. शहरातील इतर भागांत दररोज पाणी सोडले जात असले तरी काही भागात चार दिवसांनी एकदाच पाणी येते. नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या असून, शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी सातत्याने केली आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळतात, प्रत्यक्षात उपाययोजना होत नसल्याचे चित्र दिसत आहे.अनेक दिवसांपासून गढूळ व अशुद्ध पाणी मिळाल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीने हाती घेतलेले वॉटर फिल्टरचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पाणीपुरवठा तातडीने सुरू न झाल्यास महिलांच्या वतीने ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह.. इंद्रायणी कॉलनीतील पाणीपुरवठ्याची समस्या नवी नाही. वारंवार ही समस्या निर्माण होते, परंतु प्रत्येकवेळी ग्रामपंचायतीकडून केवळ तात्पुरती सोय केली जाते. कायमस्वरूपी तोडगा काढण्याची तयारी प्रशासनाकडे नसल्याचा आरोपनागरिकांकडून होत आहे. कोणतीही पर्यायी सोय न केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.