Desis Decide Summit : “भारताशी ‘त्या’ मुद्द्यावर चर्चा करणे आवश्यक, उपदेश नको..”; अमेरिकेच्या संसद सदस्यांचा बायडेन यांना सल्ला….

Desis Decide summit :- अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने मानवाधिकारांच्या मुद्द्यावर भारताशी चर्चा करावी असे भारतीय वंशाच्या अमेरिकी संसद सदस्यांनी म्हटले आहे. भारतासोबतच्या चर्चेत हे मुद्दे उपस्थित केले जावेत असे सांगतानाच त्यांनी भारतातील माध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दाही उपस्थित केला व या दिशेने पुढे काय होते आहे त्याकडे सरकारने लक्ष द्यावे असे म्हटले आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांच्या एका संमेलनात त्यांनी ही भूमिका मांडली. त्यात बायडेन सरकारला सल्ला देताना भारताला आत्मपरिक्षण करायला लावणाऱ्या काही मुद्द्यांचाही उहापोह केला. मानवाधिकारांशी संबंधित बाबींमध्ये भारताला उपदेश देऊन काही होणार नाही. मात्र भारतीय नेतृत्वाशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे असे नमूद करतानाच भारतीय वंशाचे सदस्य रो खन्ना म्हणाले की, भारत शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ गुलामगिरीत राहीला आहे. त्यामुळे जेंव्हा आपण मानवाधिकारांबाबत बोलतो, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी किंवा अन्य कोणाशी बोलतो तेंव्हा आपण हे समजून घ्यायला हवे की या गोष्टी केवळ भारताला उपदेश दिल्यासारख्याच दिसतात. मला वाटते की आमच्या लोकशाहीत या त्रुटी आहेत. तुमच्या लोकशाहीत काय उणीवा आहेत. आपण संयुक्तपणे लोकशाही आणि मानवाधिकारांसाठी काय करू शकतो अशी भारतासोबत चर्चा करणे हा अधिक रचनात्मक दृष्टीकोन असेल.
भारतीय वंशाचे अमेरिकी संसद सदस्य श्री. ठाणेदार, प्रमिला जयपाल, डॉ. एमी बेरा यांनीही रो खन्ना यांच्यासोबत या चर्चेत सहभाग घेतला. एबीसीचे जोहरीन शाह यांनीचर्चेचे सूत्र संचालन केले. एमी बेरा म्हणाले की आपण भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना हेच सांगितले की जर भारताने धर्मनिरपेक्ष राष्ट्र अशी आपली ओळख गमावली तर उर्वरित जगाच्या त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टीत बदल होईल. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सत्तेत राहणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत राहण्यासारखेच आहे असे नाही. त्याचे कारण आमच्याकडे (अमेरिकेत) अद्याप एक जिवंत लोकशाही आहे. डेमोक्रॅटीक पक्षाच्या रूपाने आमच्याकडे अजुनही एक जिवंत विरोधी पक्ष आहे.
प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यामध्ये आमचा अजुनही विश्वास आहे. आणि या सर्व बाबी भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने मला चिंतीत करतात. जिवंत लोकशाहीत सगळ्याच गोष्टी असल्या पाहिजेत. बोलण्याचे स्वातंत्र्य, माध्यमांना स्वातंत्र्य असले पाहिजे. अमेरिकेत आम्हाला ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ पाहावा लागणार अशी मला आशा आहे. आणि जरी आम्हाला तो पाहावा लागलाच तरी आमची लोकशाही जिवंत राहील. मी आशा करतो की भारतातील लोकशाहीही जिवंत राहील.
China-Russia Relations : पुतिन आणि जिनपिंग यांच्या भेटीने अमेरिका अस्वस्थ, बीजिंगला दिली धमकी…
बेरा आणि खन्ना यांच्या मताशी सहमती दर्शवत प्रमिला जयपाल म्हणाल्या की आपल्या देशाच्या उणीवा आणि अन्य कोणत्याही देशाच्या उणीवा यांवर टीका करण्यास आपण सक्षम असले पाहिजे. तेच संसदेचे खरे कार्य आहे. आपण उपदेश द्यायला नको.अमेरिकेच्या हिताच्या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. भारत आपला एक महत्वपूर्ण भागिदार आहे. क्षेत्रीय आणि वैश्विक स्तरावरील बदलत्या वातावरणात भारत आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर आपले मत मांडताना श्री. ठाणेदार म्हणाले की भारत- अमेरिका यांच्या दृढ संबंधांचे ते समर्थक आहेत. दोन्ही देशांमधील संबंध भक्कम असण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेला भारताची शक्ती, भारताची आर्थिक शक्ती ओळखावी लागेल. चीनच्या आक्रमकतेचा मुकाबला करण्यासाठी भारतच सगळ्यांत प्रमुख तोडगा आहे.





