धक्कादायक ! वीटभट्टी मालकांनी ३२ परप्रांतीय मजुरांना डांबले ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कारवाई

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर : उत्तर प्रदेश राज्यातून वीट भट्टी कामासाठी आलेल्या कामगारांचा मुकादम वीट भट्टी मालकांकडून कामाचे आगाऊ पैसे घेऊन निघून गेल्याने तब्बल २० विटभट्टी मजुरांना व त्यांच्या बारा लहान मुलांना असे एकूण ३२ जणांना नजर कैदेत ठेवलेल्या कामगारांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने इंदापूर तहसील व पोलीस प्रशासनाने सुटका करीत चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
वेदप्रकाश पूर्ण नाव पत्ता माहीत नाही,सचिन अशोक शिंदे,राहणार -इंदापूर,कुमार गोकुळ दिवसे,राहणार नरुटवाडी तालुका इंदापूर आणि राहुल नारायण शेटे,राहणार भांडगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असूनशाहरुख गुलाब शाह हसन( वय २५ वर्षे)राहणार जोगीपूर,तालुका चंदौशी जिल्हा हसनपुर, उत्तरप्रदेश याने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उत्तर प्रदेशच्या जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त तसेच जनसाहस या संस्थेला यांना बंदी करून नजर कैदेत ठेवल्याचे पत्रव्यवहार करीत कळवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.मुकादमाला दिलेले पैसे भेटत नाही तोपर्यंत सर्व कामगारांनी या ठिकाणी काम करावे लागेल तसेच इथून तुम्ही जाऊ शकत नाही असे म्हणत त्यांची अडवणूक करून त्यांना जाण्यास विरोध करीत नजर कैदेत ठेवत त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते.
इंदापूर तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाने इंदापूर नरुटवाडी आणि भांडगाव,ता.इंदापूर, या ठिकाणाहून मंगळवारी 14 ऑक्टोबर ते शनिवारी 18 ऑक्टोबर पर्यंत 32 पैकी दहा पुरुष दहा महिला आणि बारा लहान मुले या सर्वांना प्रशासकीय भवनातील तहसील कार्यालयाच्या आवारात राहण्याची जेवणाची व्यवस्था केली होती. शनिवारी सायंकाळी या सर्वांना खाजगी वाहनाने उत्तर प्रदेश कडे रवाना करण्यात आले.पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.





