Hand Pulled Rickshaw : ई-रिक्षा खरेदी केली, तरी परवानगी नाही! प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पुन्हा एक जीव संकटात

प्रभात वृत्तसेवा
माथेरान – सुमारे तीन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हातरिक्षा ही अमानवीय प्रथा असल्याचे म्हटले होते. सहा महिन्यांत सर्व हातरिक्षा बंद करुन चालकांचे पुनर्वसन करण्याचे आदेशही दिले होते. परंतु प्रत्येक कामात उशीर करण्याच्या प्रशासनाच्या सवयीने आणखी एक जीव धोक्यात आला आहे. स्वत:च्या पैशाने ई-रिक्षा खरेदी करुनही परवानगी न मिळाल्याने एका व्यक्तीस आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हातरिक्षा ओढावी लागली. यामुळे त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला. गेल्या डिसेंबरमध्ये हातरिक्षा ओढताना एका चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. तरी देखील प्रशासन ढिम्मच आहे.
हातरिक्षाचालक अंबालाल वाघेला यांना शुक्रवारी (दि. ३) रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने तातडीने बी.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीत त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. डॉ. प्रशांत यादव यांनी तातडीने उपचार केल्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे की, हातरीक्षा ही अमानवीय प्रथा असून त्यामुळे चालकांना हृदयविकार, दमा, अशक्तपणा यांसारखे आजार होतात. न्यायालयाने सहा महिन्यांत सर्व हातरीक्षा बंद करून चालकांचे पुनर्वसन ईरीक्षा योजनेंतर्गत करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशानंतर अद्याप सनियंत्रण समितीची एकही बैठक झालेली नाही. प्रशासनाचा हा ढिसाळपणा पाहून रिक्षाचालकांमध्ये संताप उसळला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये हातरिक्षा ओढताना चालक काळुराम पिरकट यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता, आणि आता पुन्हा एका चालकाचा जीव थोडक्यात वाचला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासन झोपेत का..
रोज ओझे ओढून उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकांचे जीव गमावल्यानंतरच सनियंत्रण समिती जागी होणार आहे का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ निर्णय घेऊन ई-रिक्षा योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
“सततचा श्रम आणि शारीरिक ताण यामुळे त्यांच्या हृदयावर परिणाम झाला आहे. अशा कामामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे आता त्यांना श्रमाची कोणतीही कामे करण्यास मनाई केली आहे.”
– डॉ. प्रशांत यादव





