nagar | जिवाभावाची नाती जपता जपायला शिका – गणेश शिंदे

कोपरगाव, (प्रतिनिधी) – डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य असल्याशिवाय माणूस म्हणून आपल्याला जगता येणार नाही. जगण्यासाठी आज पैसा महत्वाचा असला तरी, जिवाभावाची नाती जपता आली नाही तर तुमच्या जगण्याला अर्थच उरत नाही म्हणून आधी नाती जपायला शिका, असे उद्गार व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी काढले.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या २० व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून ‘ जीवन सुंदर आहे..’ या विषयावरील व्याख्यानात प्रा. गणेश शिंदे बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी स्थानिक निधी विभागाचे सहाय्यक संचालक बाबासाहेब घोरपडे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,
पद्माकांत कुदळे, कैलासचंद ठोळे, उमाताई वहाडणे, अर्जुनराव काळे, चांगदेव कातकडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलेर गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनीही भाषणातून संवत्सर व कोपरगांव परिसरात स्व. आण्णांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली.
यावेळी संवत्सर व महिल महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना नामदेवराव परजणे पाटील शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले. बाळासाहेब सहाणे टेलर यांच्यातर्फे जनता हायस्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, गोदावरी दूध संघाचे संचालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले.





