Pune District : अक्षर कळे संकट टळे

माऊलींच्या सोहळ्यात साक्षरतेची वारी
दिवे – शिका अंक वाचन शिका शिक्षण लेखन, गेले सांगून ज्ञाना-तुका झाला उशीर तरीही शिका, अ, ब, क, ड शिकू या देश साक्षर बनवूया, अक्षर कळे संकट टळे तसेच साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा, आजचे शिक्षण उद्याचे भविष्य, सुखसमृधीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा.
संगीताच्या तालात नृत्य करीत विविध घोषवाक्य. समोर नागरिकांची गर्दी, टाळ्यांच्या कडकडाटात दिलेली साथ. यामुळे वारीत साक्षरतेच्या गीतांनी अक्षरशः भुरळ घातली होती.
केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मागील वर्षीपासून वारी साक्षरतेची हा उपक्रम संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी सोहळ्याबरोबर सुरू करण्यात आला आहे.
वारीतील वारकर्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुणे शिक्षण संचालनालयाकडून चित्ररथ तयार केला असून बुलढाणा येथील शिक्षक साबळे व त्यांची टीम आळंदीपासून पंढरपूर पर्यंत शिक्षणाचा प्रचार प्रसाराचे काम करत आहे. या माध्यमातून साक्षरता बाहुली नाट्य, साक्षरता गीते तसेच साक्षरतेची घोषवाक्य, घडीपत्रिकेद्वारे साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.
वय 14 वर्षांवरील जे असाक्षर आहेत त्यांची नावे शिक्षकांनी नोंदवून त्यांना जे स्वयंसेवक शिकवणार आहेत त्यांची जोडणी करून देऊन त्यांना लेखन, वाचनाचे धडे दिले जात आहेत. या अक्षरांना एकविसाव्या शतकातील कौशल्ये जे की डिजिटल साक्षरता, बँक व पोस्ट व्यवहार याबाबत देखील मार्गदर्शन केले जात आहे.
आळंदी ते पंढरपूर मार्गावर विसावा ठिकाणे आणि मुक्कामच्या ठिकाणी संपूर्ण गावात उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विषयसाधन व्यक्ती ज्योती दळवी यांनी दिली.





