Pune District : गटारीची पाइपलाइन नियमानुसार टाका

शिरूर : शिरुर नगरपरिषदच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्याच्या सामासिक अंतरातून गटार व पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. हे बेकायदेशीर असून हे काम थांबवण्याची मागणी शिरूर मनसेच्या वतीने करण्यात आली होती. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा सह आयुक्त यांनी नियमानुसार रस्त्याच्या सामासिक अंतरा बाहेरून या पाइपलाइन टाकाव्यात असे आदेश दिले आहेत.
मनसेने निवेदनात म्हटले होते की, शिरुर नगरपरिषद गेल्या १ वर्षापासून चुकीच्या पध्दतीने शासन निर्णयाची पायमल्ली करुन रस्त्याच्या सामासिक अंतरामध्ये, तर कधी रस्त्याच्या पद पथामध्ये बेकायदेशिर गटार व पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम करीत आहे. यासाठी खासगी संस्थांना वेगवेगळया प्रकारची परवानग्या देऊन चुकीची कामे करीत आहेत.
शिरुर शहराची वाढती लोकसंख्या पाहता रस्त्याचे रूंदीकरण करणे (डेव्हलपमेंट प्लॅननुसार) गरजेचे आहे. व आगामी काळात हे अडचणीचे ठरणार आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन शिरुर नगरपरिषद रस्त्यामध्येच खासगी संस्थांना वेगवेगळया पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी देत आहेत.
कामाची तात्काळ चौकशी करावी व जनतेच्या निधीचा होणारा अपव्यय थांबवावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरुर नगरपरिषदेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष महिबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड, मनसेचे शहर सचिव रवी लेंडे यांनी दिला होता. याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा सह आयुक्त यांनी नियमानुसार रस्त्याच्या सामासिक अंतरा बाहेरून या पाइपलाइन टाकाव्यात, असे आदेश दिले आहेत.





