Pune-Nashik railway : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात तांत्रिक अडथळा निर्माण झाला असून, नारायणगाव येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) ऑब्झर्व्हेटरीमुळे या प्रकल्पाचा मूळ आराखडा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रेल्वेच्या प्रस्तावित मार्गामुळे या जागतिक स्तरावरील दुर्बिणीच्या कामात व्यत्यय येत असल्याने केंद्र सरकारने मूळ मार्गावर आक्षेप नोंदवला आहे. परिणामी, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या तांत्रिक पातळीवर अडकून पडला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रकल्पाच्या विलंबाबाबत आणि मार्ग बदलून तो शिर्डीमार्गे नेण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. नारायणगाव येथील ही रेडिओ दुर्बीण केवळ भारताची नसून तीमध्ये ३२ देशांचा सहभाग आहे. railway या दुर्बिणीच्या संदर्भातील आंतरराष्ट्रीय नियमावली अत्यंत कडक असून, त्यामध्ये कोणताही बदल करणे किंवा ही यंत्रणा तिथून हलवणे अशक्य असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. रेल्वे धावताना होणाऱ्या लहरींमुळे दुर्बिणीच्या सिग्नलमध्ये अडथळा येऊ शकतो, हा मुख्य तांत्रिक पेच याठिकाणी निर्माण झाला आहे. या प्रकल्पामुळे पुणे आणि नाशिकमधील कनेक्टिव्हिटी वाढणार असली, तरी वैज्ञानिक सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मूळ मार्गात मोठे फेरबदल करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे मार्ग शिर्डीमार्गे वळवल्यास हा अडथळा दूर होऊ शकतो का, यावरही आता विचार मंथन सुरू झाले आहे. केंद्राच्या या भूमिकेनंतर राज्य सरकार आता पर्यायी मार्गांचा अभ्यास करून प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही बातमी वाचा : Railway Job : रेल्वेची मेगा भरती.! ‘या’ पदांसाठी मोठी संधी, अर्जाची शेवटची तारीख पाहा…