नारायणगावात ८० एकरवर अवतरणार आधुनिक शेती; ‘ग्लोबल कृषी महोत्सवात’ काय आहे खास? वाचा

प्रभात वृत्तसेवा
नारायणगाव – शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान, नवतंत्रज्ञानाची माहिती आणि थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे ८ ते ११ जानेवारी दरम्यान ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार असून,
पीक प्रात्यक्षिकांचे उद्घाटन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होईल.या महोत्सवासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, नाबार्डच्या मुख्य महाप्रबंधक रश्मी दरड, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके यांसह कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, आत्मा, नाबार्ड आणि विविध बँकांच्या सहकार्याने हे आयोजन केले आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या ८० एकर प्रक्षेत्रावर भाजीपाला, फळपिके, संरक्षित शेती, विदेशी भाजीपाला, नैसर्गिक शेती आणि मिलेट उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी शेतकऱ्यांना करता येईल.
महोत्सवात धान्य महोत्सव हे विशेष आकर्षण असून तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि सेंद्रिय डाळींची थेट विक्री केली जाणार आहे. महिला बचत गटांचे स्टॉल्स आणि विविध खाद्यपदार्थांची मेजवानीही येथे असेल. २०२६ हे जागतिक शेतकरी महिला वर्ष असल्याने ९ जानेवारी रोजी महिलांसाठी खेळ कृषी पैठणीचा हा विशेष कार्यक्रम आयोजित केला असून त्यात लाखोंची बक्षिसे दिली जाणार आहेत.
पीक परिसंवाद व तज्ज्ञांचे मार्गदर्शन
-८ जानेवारी, दु. ३ वा – ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक
-९ जानेवारी, सकाळी १० – डॉ. सुनील दिंडे – बदलत्या हवामानातील भाजीपाला पिक व्यवस्थापन
-९ जानेवारी, दु. २ वा – सागर कोपर्डीकर – निर्यातक्षम केळी उत्पादन व एआय तंत्रज्ञान
-१० जानेवारी, स. १० वा – प्रा. विक्रम कड – कृषी प्रक्रिया व मूल्यवर्धनातील संधी
-१० जानेवारी, दु. २ वा – डॉ. विवेक भोईटे – ऊस उत्पादन व एआय तंत्रज्ञान
-११ जानेवारी, स ११ वा – प्रगतशील शेतकरी गणेश नानोटे व वर्षा मरकड – नैसर्गिक शेतीतील पंचसूत्री व देशी गोवंश
जागतिक शेतकरी महिला वर्षानिमित्त विशेष आयोजन
सन २०२६ हे जागतिक शेतकरी महिला वर्ष म्हणून जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर दि. ९ जानेवारी रोजी दुपारी ४.०० वाजता ‘खेळ कृषी पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची लयलूट असणार आहे.





