Land Survey: अवघ्या 15 दिवसात काम होणार! जमीन मोजणीबाबत महसूलमंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा, खासगी भूमापकांची नियुक्ती
Land Survey: शेती आणि प्लॉट मोजणीचा वेग वाढणार असून अर्ज केल्यानंतर १५ दिवस ते एका महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Land Survey: जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या मदतीला आता खासगी भूमापकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे शेती आणि प्लॉट मोजणीचा वेग वाढणार असून अर्ज केल्यानंतर १५ दिवस ते एका महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मूर्तिजापूर तालुक्यातील लक्षेश्वर संस्थान, लाखपुरी येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल, माजी आमदार बळीराम सिरस्कार, सरपंच राजू कैथवास, नगराध्यक्ष हर्षल साबळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात १०० खासगी भूमापक –
अकोला जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाला मदत म्हणून १०० खासगी भूमापक नियुक्त केले जाणार आहेत. यामुळे शेती व प्लॉट मोजणी जलद गतीने पूर्ण होईल. ‘महाराजस्व अभियान’ शिबिरांमधून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
पांदण रस्ते व शेतीपर्यंत पोहोच सुलभ –
मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेअंतर्गत शेतरस्त्यांचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड केली जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना थेट शेताच्या बांधापर्यंत पोहोचणे सोपे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोजणी शुल्कात सुलभता –
शेती मोजणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रशासनाने काही निर्णय घेतले आहेत. पोट विषयाची मोजणी केवळ २०० रुपयांत केली जाणार असून पट्टेवाटपाची नोंदणी फक्त १ हजार रुपयांत करण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. पुढील दोन वर्षांत मोजणीची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यावर भर दिला जाणार आहे.
मालकी हक्कातील अडथळे दूर –
तुकडे बंदी कायद्यातील सुधारणांमुळे गुंठेवारी आणि लहान भूखंडांच्या मालकी हक्कातील अडथळे दूर झाले आहेत, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. तसेच ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसनासह मालकी हक्काचे पट्टे वाटप व नोंदणी प्रक्रियेला गती देण्यात आली असल्याचे आमदार हरीश पिंपळे यांनी नमूद केले.




