Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनाच्या तयारीची लगबग
Lakshmi Pujan:

पूजेच्या साहित्य खरेदीसाठी मंडई परिसर गजबजला
Lakshmi Pujan: दिवाळीत सर्वाधिक महत्त्व असलेले लक्ष्मीपूजन उद्या, रविवार असून त्याच्या तयारीसाठी विविध बाजारपेठांत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
यंदा पूजेच्या साहित्याच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी लक्ष्मीचा फोटो आणि पावले, लाह्या, बत्तासे, बोळकी, हळद-कुंकू, उसाचे धाट, धान्य, बोळकी, विड्याची पाने, नारळ आणि पूजेसाठी आवश्यक पाच फळांच्या खरेदीलाही मोठी गर्दी होती. रविवारी सायंकाळी ५.५० ते रात्री १० या वेळेत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याने नागरिकांसह व्यापारी वर्गानेही पूजेचे नियोजन केले आहे.
लक्ष्मीपूजनासाठीच्या साहित्याच्या खरेदीला गेल्या दोन दिवसांपासून वेग आला आहे. पूजेचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी नागरिक मंडई आणि अन्य बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. फुलांची, पूजेच्या साहित्याची दुकाने आणि फळविक्रेत्यांकडे ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.
लक्ष्मीपूजनासाठी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. दुकाने, कार्यालयांची स्वच्छता, रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाईची कामे पूर्ण झाली असून, व्यापारी वर्गाला लक्ष्मीपूजनाचे वेध लागले आहेत. छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार, कंपन्या, संस्था आणि विविध सामाजिक मंडळांकडून पूजनाची तयारी पूर्ण झाली आहे.
वर्षभरातील आर्थिक व्यवहारांचा हिशेब पूर्ण करून नवीन आर्थिक वर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक म्हणून व्यापारी लक्ष्मी आणि वहीखात्याचे पूजन करणार आहेत. सुख, समृद्धी आणि व्यवसायात भरभराट लाभावी, यासाठी पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाईल.
लक्ष्मीपूजनासाठी शुभ, लाभ आणि अमृत मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. घराघरांत लक्ष्मी आणि गणपतीचे पूजन, आरती आणि नैवेद्याची तयारी सुरू आहे. पूजेनंतर दिव्यांची आरास आणि फटाक्यांची आतषबाजी धूमधडाक्यात होईल.
पूजेच्या साहित्याचे दर Lakshmi Pujan:
उसाचे धाट – ५० ते ७० रुपये
बोळकी – ६० ते १०० रुपये
लक्ष्मीची प्रतिमा – ५० ते ६० रुपये
लक्ष्मीची पावले – ३० ते ५० रुपये
रांगोळी – ४० ते ५० रुपये
लाह्या – १० रुपये
बत्तासे – १० रुपये





