Lakhan Bhosale encounter | लखन एन्काउंटर प्रकरणात सातारा डीबी ठरली ‘सिंघम’

प्रभात वृत्तसेवा
सातारा – साताऱ्याचा अट्टल गुन्हेगार लखन भोसले याचा 96 तासाच्या जिगरबाज तपासानंतर सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एन्काऊंटर करत दबंगगिरी दाखवून दिली आहे. कोयता गँगच्या दहशतीला सातारा पोलिसांनी थेट बुलेटनेच उत्तर दिल्याने जिल्ह्यातील कथित भाईंची चांगलीच टरकली आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, रोहित पवार, रोहित भोसले आणि त्यांचे पथक यांच्या अतुलनीय धाडसाचे राज्यात कौतुक होत आहे. या प्रकरणात सातारा शहर पोलिसांनी तब्बल अडीचशे सीसीटीव्ही फुटेज चे बारकाईने निरीक्षण करून वडगाव स्वामी ते थेट शिक्रापूर असा अचूक मार्ग काढला.
96 तासाच्या या जिगरबाज तपासामध्ये सातारा शहर पोलिसांनी आपले तपास कौशल्य पणाला लावले. वडगाव जयराम स्वामी, ता. खटाव येथील अट्टल गुन्हेगार लखन भोसले यांच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये 28 सांगली जिल्ह्यात दोन तर पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात चार घरफोडी जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते. मोक्यातून जामिनावर सुटलेल्या लखनने सातारा जिल्ह्याच्या हद्दीत पुन्हा कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचे उद्योग सुरू केले.
गेल्या चार महिन्यातील बारा प्रकरणांमध्ये लखनचा सक्रिय सहभाग होता अशी माहिती त्याचा साथीदार अमर गुलाप्पा केरी यानेच दिली.कृष्णानगर येथील मेडिकल कॉलेजसमोर अमर केरी व लखन भोसले यांनी कोयत्याचा धाक दाखवून एकामहिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटले होते. येथील सीसीटीव्ही फुटेजचा संदर्भ घेऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तीन पथकाने तीन स्वतंत्र दिशेला तपास केला.
या प्रकरणांमध्ये सातारा पोलिसांनी कृष्णानगर, पुसेगाव, चौकीचा आंबा, शिरंबे तेथून रहिमतपूर मार्गावरील ढाबा, वडूज त्याचबरोबर लखनचे मूळ गाव असणाऱ्या जयराम स्वामी वडगावपर्यंत फुटेज प्राप्त करत अडीचशे चलचित्रांची पाहणी केली. त्यावरून लखन भोसले हा सांगलीच्या दिशेने पळून गेल्याची शंका उत्पन्न झाली होती. मात्र, पुन्हा एकदा पोलिसांचा तांत्रिक तपास आणि बातमीदारांच्या माध्यमातून लखन पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे त्याच्या बहिणीकडे गेल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्याम काळे राजेंद्र मस्के यांची दोन पथके सक्रिय होती. यातील एक पथक तात्काळ वाहनासह शिक्रापूर येथील भुजबळ नगरच्या दिशेने रवाना झाले लखन भोसले तेथील एका इमारतीमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने या मार्गाची रेकी करत अमर केरी याला अटक केली. त्यावेळी लखन दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी चालत पंपावर गेला होता.
तिथून माघारी परतताना केरी याने इशारा करून सातारा पोलीस आल्याचा आरडाओरडा केला तेव्हा तेथून लखन भोसले ने थेट घराच्या मागच्या दिशेने पलायन केले.गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सुजित भोसले आणि तुषार भोसले हे दोन कॉन्स्टेबल जवान लखनच्या दिशेने पळाले. तेव्हा लखनने आक्रमक पवित्रा घेत आपल्याकडील चाकूचा वार सुजित यांच्यावर केला.यामध्ये बरगडीला चाकू लागून ते गंभीर जखमी झाले.
लखन याने तुषार भोसले याच्यावर सुद्धा चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला असता जखमी अवस्थेतील सुजित भोसले यांनी लखन भोसलेचा एन्काउंटर केला. पोलिसांच्या या अतुलनीय धाडसामुळे कोयता गँगला बुलेटनेच उत्तर मिळाले. या झटापटीमध्ये तुषार भोसले यांच्या हातावर सुद्धा चाकूचा गंभीर वार झाला दोघांनाही पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथेच लखन भोसले याला मृत घोषित करण्यात आले आहे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी याबाबतच्या माहितीला दुजोरा दिला आहे.





