तैवानच्या अध्यक्षपदी लाय चिंग-ते यांचा शपथविधी

तैपेई, (तैवान) – तैवानच्या अध्यक्षपदी आज लाय चिंग-ते यांचा शपथविधी झाला. तैवानच्या लोकशाही धोरणांच्या अंमलबजावणीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी लाय हे तुलनेने तुलनेने मवाळ मानले जातात.
तैवान हा चीनचाच भूप्रदेश आहे, असा दावा चीनकडून सातत्याने केला जातो आहे. तैवानला चीनच्या मुख्यभूमीशी जोडण्यासाठी प्रसंगी बळाचा वापर देखील करण्याची चीनची तयारी आहे.
अध्यक्षपदी शपथविधी झाल्याबद्दल तैवानशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या जवळपास डझनभर देशांच्या प्रमुखांनी लाय यांचे अभिनंदन केले आहे. यामध्ये अमेरिका, जपान आणि युरोपातील देशांच्या प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे.
लाय यांनी आपल्या राजकीय कारिर्दीची सुरुवात तैनान शहराच्या महापौरपदापासून केली. तेथपासून देशाच्या उपाध्यक्षपदापर्यंत त्यांनी प्रगती केली. त्साई इंग-वेन यांनी ८ वर्षांच्या कार्यकाळात कोविड-१९ ची साथ आणि चीनच्या लष्करी आक्रमणाचा धोका असतानाही तैवानची आर्थिक आणि सामाजिक प्रगती केली.
त्यांचे उत्तराधिकारी म्हणून लाय यांची निवड करण्यात आली आहे. तैवानचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाबाबत २०१७ पर्यंत आक्रमक असलेले लाय हे नंतरच्या काळात मवाळ नेते झाले आहेत.
आता तैवानच्या समुद्रधुनीत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याकडे त्यांचा कल अधिक आहे. त्साई यांच्या प्रमाणेच अमेरिकेशी घनिष्ठ संबंध ठेवण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे.





