Ladki Bahin Yojana : ८० लाख महिला अपात्र! ‘लाडकी बहीण’ योजनेविरोधात निगडीत ‘रुसवा आंदोलन’
Ladki Bahin Yojana : अपात्र महिलांना तात्काळ पात्र करा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडू; कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा इशारा.

Ladki Bahin Yojana – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याच्या निषेधार्थ कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रच्या वतीने निगडी येथील तहसीलदार कार्यालयासमोर “लाडक्या बहिणींचे रुसवा आंदोलन” करण्यात आले. या आंदोलनात शेकडो महिलांनी सहभाग घेत शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी सरकारवर टीका करत, निवडणुकीच्या काळात ज्या महिला सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने ‘लाडक्या बहिणी’ होत्या, त्या आता परक्या का झाल्या आहेत, असा सवाल उपस्थित केला. तसेच १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांनी “फसवू नका, लाडक्या बहिणींना रुसवू नका”, “१५०० नको, २१०० द्या” आणि “अपात्र महिलांना पात्र करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. केवायसी प्रक्रियेदरम्यान सर्व्हर डाऊन होणे, ओटीपी न मिळणे आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना लाभापासून वंचित राहावे लागल्याची खंत महिलांनी व्यक्त केली.
नखाते यांनी सांगितले की, सुरुवातीला सुमारे २ कोटी ४७ लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र आता ८० लाखांहून अधिक महिलांना अपात्र घोषित करण्यात आल्याने राज्यभरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंदोलनानंतर शिष्टमंडळाने नायब तहसीलदार डॉ. मनीषा माने-लोंढे यांना निवेदन सादर केले. पात्र महिलांना पुन्हा लाभ मिळावा, दरमहा २१०० रुपये अर्थसहाय्य देण्याचे आश्वासन पूर्ण करावे आणि वंचित महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.





