“आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी, आम्हालाही कष्टाचा मोबदला द्या” ; अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी

Ladki Bahin Yojana । ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही विधानसभा निवडणुकीसाठी गेमचेंजर ठरली. याच योजनेमुळे महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्यास मदत मिळाली आहे. दरम्यान, महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आता डिसेंबरच्या हप्त्याचे कालपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, आता ही योजना यशस्वी करुन दाखवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा सरकारला विसर पडला असल्याचे दिसत आहे. कारण अंगणवाडी सेविकांना एका फॉर्मला 50 रुपये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप अंगणवाडी सेविकांनी भरलेल्या अर्जांची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहचली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आता “आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी आहोत, आम्हाला आम्ही केलेल्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे,” अशी मागणी या अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
अंगणवाडी सेविका मानधनापासून वंचित Ladki Bahin Yojana ।
राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून योजनेचा सहावा हप्ता मिळण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या योजनेचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रती फॉर्म मागे मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून वंचित आहेत. ही योजना सुरू झाली तेव्हापासूनचा हा लाभार्थी महिलांना मिळणारा सहावा हप्ता आहे. मात्र लाडक्या बहिणींचे 2 कोटी 34 लाख फॉर्म भरून देणाऱ्या आणि अगदी कमी वेळेत योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रती फॉर्म मागे सरकार कडून मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून अद्यापही वंचित आहेत.
एक फॉर्म भरून देण्यामागे पन्नास रुपये मानधन Ladki Bahin Yojana ।
जून महिन्यात योजना लाँच झाल्यानंतर सरकारकडून अंगणवाडी सेविकांना महिलांचा एक फॉर्म भरून देण्यामागे पन्नास रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांनी दिवस-रात्र काम करून शेकडो महिलांचे फॉर्म भरून दाखवले, त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल 2 कोटी 34 लाख एवढी प्रचंड झाली आहे. योजना यशस्वी होऊन राज्यात महायुतीचा सरकार पुन्हा सत्तेतही आलं. मात्र अंगणवाडी सेविकांना प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये अद्यापही मिळालेले नाही. नवीन वर्षात तरी सरकार आमची आठवण ठेवेल, अशी अपेक्षा आता अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन देणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडून त्यांनी नेमके किती फॉर्म भरुन घेतले याबाबतची आकडेवारी जमा करुन घेताना देखील ती पूर्णपणे घेतली नसल्याची तक्रार आहे. काही अंगणवाडी सेविकांनी जितके अर्ज भरले त्यापेक्षा कमी अर्जांची संख्या वरिष्ठांकडून नोंदवून घेतली गेल्याचेही समोर आले आहे.
हेही वाचा
महायुतीत आता पालकमंत्रिपदावरून वाद ; कोणत्या जिल्ह्यात कोण समोरासमोर आहे?





