Nagar | लाडकी बहिण योजनेचे सर्व्हर डाऊन, बहिणींना पंधराशे रुपयांची प्रतीक्षा

पारनेर, ( प्रतिनिधी) – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने बहिणींना अर्ज दाखल करण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील महिलांसाठी मोठ्या योजनेची घोषणा केली होती.
यात महिलांसाठी आॅनलाईन पद्धतीने सविस्तर माहितीसह अर्ज दाखल केला तर दरमहा पंधराशे रुपये त्या महिलेच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. या घोषणेने महिला वर्गात मोठा उत्साह जाणवत होता. परंतु गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून या योजनेचे सर्व्हर चालत नसल्याने विविध कागदपत्रांसह भरलेली माहिती पुढे जात नसल्याने लाडक्या बहिणी थोड्या हिरमुसलेल्या दिसत आहेत.
लाडक्या बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नारी शक्ती दूत म्हणून मोबाईल अँप विकसित केले आहे. राज्यभरातून एकाच वेळी लाखो अर्ज जाऊ लागल्याने त्या अँपवर लोड आल्याने हे अँप चालत नाही. पर्यायाने महिलांचे अर्ज पुढे दाखल होत नाही.
पंधराशे रुपये मिळतील या आशेने सुरवातीला महिलांनी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा दाखला ( डोमासाईल ) मिळवण्यासाठी धावपळ केली. कालांतराने मुख्यमंत्र्यांनी अनेक अटी शिथील केल्या असल्या तरी अर्ज पुढे दाखल होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी शासनाने सध्या मोबाईल अँप लाँच केले आहे तर लवकरच लिंक येईल असे सांगितले जात आहे. शासनाने अर्ज दाखल करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध केले तर गर्दी विभागली जाऊन अर्ज दाखल होतील, अशी अपेक्षा नागरिकांना व लाडक्या बहिणींना लागली आहे. सध्या तरी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागत आहे.





