Nagar | आयर्न मॅन स्पर्धेत डॉ. जय पोटे यांचा जगात २२ वा क्रमांक

पारनेर, (प्रतिनिधी) – डॉ. जय पोटे यांनी अलीकडेच जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित आयर्न मॅन स्पर्धेत २२ वा क्रमांक मिळवून भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरवली आहे.
त्यांच्या या यशाचा अनुभव कथन आणि मुलाखतीचा कार्यक्रम डी.बी.एम इंग्लिश मीडियम स्कूल व श्री संत निळोबाराय विद्यालय, राळेगण सिद्धी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन सुनील हजारे, विजय पोटे आणि श्री संत निळोबाराय विद्यालय यांनी केले. आयर्न मॅन स्पर्धा ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक आहे,
ज्यामध्ये ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे अशा तीन टप्प्यांचा समावेश असतो. डॉ. पोटे यांनी १५ तास ५५ मिनिटांत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून जागतिक स्तरावर २२ वा क्रमांक पटकावला.
कार्यक्रमात डॉ. पोटे यांनी त्यांच्या तयारीचा आणि स्पर्धेतील अनुभव विद्यार्थ्यांसोबत सविस्तर शेअर केला. विद्यार्थ्यांनी स्पर्धेबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, त्यांनी मेहनत, चिकाटी आणि ध्येयासक्तीचे महत्त्व पटवून दिले.
पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांनी आपल्या मनोगतात डॉ. जय पोटे यांचे कौतुक करताना सांगितले, “डॉ. पोटे यांनी मिळवलेले यश हे फक्त त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पुढील पिढीला योग्य दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी दिशा मिळेल.





