निवडणुकीत लाडक्या बहिणीची भूमिका राहणार निर्णायक!

नगर – संगणकाच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात आपला लौकिक वाढवीत आहेत. राजकीय क्षेत्रातही आपला वेगळा ठसा महिला उमटवू लागल्या आहेत. जिल्ह्यात 37 लाख 60 हजार 512 मतदार आहेत. त्यात महिलांची संख्या 18 लाख 23 हजार 411 आहे. त्यामुळे निवडणुकीत लाडक्या बहिणींची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पुरूष मतदारांची संख्या 19 लाख 36 हजार 900 एवढी आहे.
लोकसभा निवडणुकीत महिला मतदार वाढले होते. तरीही 65 टक्क्यांवर मतदार गेले नव्हते. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील महिला मतदारांवर फोकस करीत महिला मतदारांची आकडेवारी वाढविली आहे. निवडणुकीतही महिलांची मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रयत्न होत आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचा मतदानाचा टक्का वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणूक असो की, विधानसभा निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक. महिलांचा या निवडणुकीमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. मग प्रत्यक्ष मतदान करताना महिलांचा टक्का का घसरतो, असा प्रश्न आहे.विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, जिल्ह्यात यंदा पारनेर, शेवगाव- पाथर्डी, श्रीगोंदा. शिर्डी या मतदारसंघांत महिला उमेदवार निवडणुकीत आपले भाग्य आजमावणार आहेत. राजकारणातील सक्रियता आता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. नाही म्हणायला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांचा टक्का चांगला वाढला आहे. परंतु, अपवादवगळता विधिमंडळ, लोकसभा निवडणुकीपासून महिला काहीशा दूर राहत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
सहा महिन्यापूर्वी 28 एप्रिल 2024 लोकसभा निवडणुकीत 17 लाख 61 हजार 485 महिला मतदार होत्या. या आता 61 हजार 926 महिला मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता 15 ऑक्टोबर 2024 रोजी 18 लाख 23 हजार 411 महिला मतदार आहेत. या मतदारापैकी 11 लाख 50 हजार महिलांना लाडक्या बहिण योजनेचा लाभ झाला आहे. त्यामुळे किमान या 11 लाख 50 हजार महिलांचे मतदान तरी निर्णायक ठरणार आहे.
सर्वाधिक महिला मतदार श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात 1 लाख 78 हजार 594 एवढी आहे. तर सर्वात कमी अकोले मतदारसंघात 1 लाख 27 हजार 283 एवढी आहे.




