Labor Law Maharashtra : कामगारांचा विजय! १२ तास कामाचे विधेयक मागे; कष्टकऱ्यांनी साजरा केला आनंदोत्सव
Labor Law Maharashtra : विश्रांतीविना ६ तास कामाच्या तरतुदीला कामगार संघटनांचा कडाडून विरोध; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेत घोषणा.

Labor Law Maharashtra – महाराष्ट्रातील लाखो कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने १२ तास कामांचे प्रस्तावित विधेयक अखेर मागे घेतले आहे. कष्टकरी संघर्ष महासंघाच्या आंदोलनाला मिळालेले हे मोठे यश असून कामगारांनी साखर वाटून हा आनंद साजरा केला. राज्य शासनाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा करत कामाचे तास ८ वरून १२ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता.
तसेच विश्रांतीविना सलग ६ तास काम करण्याची तरतूदही प्रस्तावित होती. या निर्णयाला कष्टकरी संघर्ष महासंघाने तीव्र विरोध केला. पिंपरी-चिंचवड व मुंबई येथे आंदोलने आणि निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. अखेर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत हे विधेयक मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला व तो मंजूर करण्यात आला. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की, “हा कामगारांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय आहे.
कामगारांच्या हितासाठी आम्ही नेहमीच लढत राहू.” हा कामगारांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय आहे. ८ तास काम, ८ तास विश्रांती आणि ८ तास कुटुंबासाठी हे आंतरराष्ट्रीय सूत्र कायम ठेवले पाहिजे असे मत संघटनेने व्यक्त केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, इरफान चौधरी, भास्कर राठोड, विनोद गवई, अनिल मोरे, अशोक कदम, अनंत कदम, सुनील काळे, विजय भोसले, सुनील गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





