Gau Tech 2026: पुण्यात 20 ते 23 मार्चला ‘गौ टेक’ आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन आणि प्रदर्शनाचे आयोजन; 300 हून अधिक स्टॉल्स
Gau Tech 2026: या प्रदर्शनात ३०० हून अधिक स्टॉल्स, गायींशी संबंधित विषयांवर १२ हून अधिक परिसंवाद, विशेष परिषदा, B2B बैठका, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग आणि ५ लाखांहून अधिक लोकांच्या उपस्थितीचा अंदाज आहे.

Gau Tech 2026: गायींवर आधारित उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुण्यात ‘गौ टेक २०२६’ हे आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज (GCCI) चे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा केली.
हे संमेलन २० ते २३ मार्च २०२६ या कालावधीत पुण्यातील शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र गौ सेवा आयोग, RR ग्लोबल आणि IFFCO यांच्या सहकार्याने GCCI हा कार्यक्रम आयोजित करत आहे.
काय असेल ‘गौ टेक २०२६’ मध्ये?
या प्रदर्शनात ३०० हून अधिक स्टॉल्स, गायींशी संबंधित विषयांवर १२ हून अधिक परिसंवाद, विशेष परिषदा, B2B बैठका, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग आणि ५ लाखांहून अधिक लोक उपस्थितीचा अंदाज आहे. कामधेनू चेअर, महिला परिषद, संत-शेती परिषद, गोशाळा परिषद, पंचगव्य परिषद, गोरक्षण परिषद आणि देशी गायींचे सजीव प्रदर्शन हे या संमेलनाचे प्रमुख आकर्षण असतील.
प्रदर्शनात सेंद्रिय खते, जैव-कीटकनाशके, दूध व दुग्धजन्य पदार्थ, गोमूत्र व गोबरावर आधारित उत्पादने, नैसर्गिक शेती, सेक्स-सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञान, सौर व जैव-ऊर्जा, चारा व बियाणे उद्योग, कृषी यंत्रसामग्री, सरकारी व खाजगी बँका, सहकारी संस्था, दुग्धसंघ, राज्य गौ सेवा आयोग, पशू खाद्य प्रक्रिया केंद्रे, स्टार्टअप्स, संशोधन व विकास उत्पादने, देशी गायींचे सजीव प्रदर्शन तसेच निसर्गोपचार, आयुर्वेद व पंचगव्य उपचार या विभागांचा समावेश असेल.
परिसंवादांचे विषय
या संमेलनात गौ पर्यटन, गौ आरोग्य, गौ आयुर्वेद, गौ आधारित शेती, गोशाळा व्यवस्थापन, गायींवर आधारित उत्पादन प्रक्रिया, पंचगव्य उत्पादने, गौ ऊर्जा व जैव-इंधन, गौ ग्राम मॉडेल, कामधेनू नगर संकल्पना, गौ वसतिगृह आणि गौ आधारित उद्योजकता प्रशिक्षण या विषयांवर परिसंवाद होतील.
उद्घाटन व समारोप
महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंडडा यांनी सांगितले की, २० मार्च २०२६ रोजी भव्य उद्घाटन सोहळा होईल, तर २३ मार्च रोजी समारोप समारंभ आयोजित आहे. कार्यक्रमस्थळी गौ परिक्रमा पथ, आदर्श गोशाळा युनिट आणि अग्निहोत्र व गौ यज्ञ यांसारख्या वैदिक परंपरांचा समावेश असेल.
मान्यवरांचे मार्गदर्शन
या संमेलनाला संत श्री चेतनानंद महाराज, कडासिद्धेश्वरजी, परमात्मानंद सरस्वतीजी, माताजी नीती अंबा यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, एस.पी. सिंग बघेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मंत्री मुरली महोल, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, पद्मश्री शास्त्रज्ञ विजय भटकर, IFFCO चे अध्यक्ष दिलीपभाई संघाणी तसेच खासदार, आमदार, शास्त्रज्ञ आणि अनेक उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत.
‘गौ टेक पुरस्कार’ आणि विशेष उपक्रम
या संमेलनात गायींवर आधारित उद्योजकता आणि गोसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल २० हून अधिक गटांमध्ये ‘गौ टेक पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहेत. याशिवाय गोमूत्र व गोबरापासून व्यावसायिक व दैनंदिन उत्पादने बनवण्याचे सजीव प्रशिक्षण वर्गही आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात इंडिया पोस्ट आणि GCCI यांच्यात सामंजस्य करार (MoU) देखील झाला असून GCCI च्या वेबसाईटची नवीन आवृत्तीही प्रकाशित करण्यात आली.
GCCI ने गोप्रेमी, गौ आधारित स्टार्टअप्स, महिला उद्योजिका, सेंद्रिय शेतकरी, गोशाळा, संशोधक आणि तंत्रज्ञान नवोन्मेषकांना स्टॉल बुक करण्याचे आवाहन केले आहे. या संमेलनाचे व्यावसायिक आयोजन Toredo Fairs India Pvt. Ltd. करत आहे.





