Kundmala Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

Devendra Fadnavis : मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती, अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.
या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 15, 2025
दरम्यान, या घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.
या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे.
काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे.
सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.” या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
दरम्यान, या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाष्य केलं. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तिथे एनडीआरफची टीम पोहोचली आहे. बचावकार्य सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार तो पूल जुना होता.
अशावेळी तिथे क्षमतेपेक्षा जास्त नागरिक उभे होते. याचवेळी एक दुचाकीही तिथून गेली. त्यामुळे हा पूल कोसळला आहे, असं त्यांनी सांगितलं तसेच याठिकाणी यापूर्वी एका पुलासाठी ८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.





