Kundamala: कुंडमळयावर फिरायला जाताय? जरा जपून! ‘या’ चुका केल्यास पोलिसांची थेट कारवाई
Kundamala: नव्या पुलाचे काम सुरू असल्याने नदीपात्रात खोल खड्डे; धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणाऱ्यांवर आणि बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई.

Kundamala – पावसाळ्याची सुरुवात होताच भेगडेवाडीजवळील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. वाढलेला नदीप्रवाह आणि हिरवाईचा आनंद घेण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत आहेत. मात्र गेल्या वर्षी झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. १५ जून २०२५ रोजी कुंडमळा येथील लोखंडी पादचारी पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला होता,
तर ५० हून अधिक पर्यटक जखमी झाले होते. ही दुर्घटना लक्षात घेऊन तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. परिसरात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि दामिनी पथकाकडून नियमित गस्त घालण्यात येत आहे. नदीपात्रात उतरणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे, बेकायदेशीर पार्किंग करणे तसेच सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून नदीपात्रात खांबांच्या पायाभरणीसाठी खोल खड्डे करण्यात आले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली ओळखणे कठीण झाले असून अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे परिसरात प्रवेश निषिद्धचे फलक लावण्यात आले आहेत. पर्यटकांनी सुरक्षित अंतरावरूनच निसर्गाचा आनंद घ्यावा, नदीपात्रात उतरू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





