Dehu Ghat selfie stunt: महापुरातही जीवाशी खेळ! इंद्रायणी नदीपात्रात उतरून पर्यटकांचा सेल्फी; नदीघाटावर वाढवला बंदोबस्त
Dehu Ghat selfie stunt: मावळात मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून; सूचना फलक धाब्यावर बसवून बुरुजांवर चढून तरुणांची सेल्फीसाठी धडपड.

Dehu Ghat selfie stunt – आषाढी एकादशी तसेच शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे शहरात भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी झाली. श्री संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हजारो भाविकांनी इंद्रायणी नदीघाटाकडे आपला मोर्चा वळविला. मात्र नदीला महापुराचे स्वरूप आलेले असतानाही काही पर्यटकांकडून जीव धोक्यात घालून नदीपात्रात उतरणे, पात्रातील बुरुजांवर उभे राहून सेल्फी काढणे आणि फोटोशूट करण्याचे प्रकार सुरू असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले.
गेल्या आठवडाभरापासून मावळ तालुक्यासह परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीचा प्रवाह अतिशय वेगवान आणि धोकादायक बनला असून नदीकाठावरील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. अशा परिस्थितीतही काही पर्यटकांनी कोणतीही भीती न बाळगता थेट नदीपात्रात प्रवेश केला.
काही तरुण नदीतील बुरुजांवर उभे राहून मोबाईलवर सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. सोशल मीडियावर रील्स बनविण्याच्या नादात अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घातल्याचे दिसून आले. काही कुटुंबांनी तर लहान मुलांनाही सोबत घेऊन नदीपात्रात प्रवेश केल्याचे प्रकारही यावेळी समोर आले. महापुराच्या काळात नदीचा प्रवाह क्षणार्धात वाढू शकतो. धरणांतून अतिरिक्त विसर्ग झाल्यास पाण्याची पातळी अचानक वाढते.
अशा वेळी नदीपात्रात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर पडण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे क्षणिक आकर्षणासाठी किंवा सेल्फीसाठी जीव धोक्यात घालणे अत्यंत धोकादायक असल्याचे परिसरातील स्थानिक नागरिकांनी सांगितले. इंद्रायणी नदीत पावसाळ्यात यापूर्वीही अनेक बुडण्याच्या आणि वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही काही पर्यटकांकडून सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
नदीकिनारी उभारण्यात आलेल्या सूचना फलकांकडेही अनेक जण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने नदीघाट परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, धोकादायक ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स उभारावेत, नदीपात्रात प्रवेश करण्यास सक्त मनाई करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
पोलीस प्रशासनाकडून तातडीने कारवाई
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित पोलीस पथकांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नदीपात्रात उतरलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तसेच इंद्रायणी घाट परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून धोकादायक ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना रोखण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.






