पुणे जिल्ह्यात 12,294 जणांना कुणबी प्रमाणपत्र

पुणे – जिल्ह्यात मागील पावणेदोन वर्षांत सुमारे 12 हजार 294 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी 1 जानेवारी 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 या काळात सुमारे 12 हजार 911अर्ज आले होते.
महसुली पुरावे तपासून त्यातील 12 हजार 294 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. एकूण अर्जांच्या तुलनेत प्रमाणपत्र वाटपाचे प्रमाण 96 टक्के आहे. उर्वरित 460 अर्ज प्रलंबित असून अर्जदारांनी वंशावळ पुरावे सादर केल्यानंतर त्यावर कार्यवाही करावी, असे आदेश संबंधित प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत.
कुणबी प्रमाणपत्र देताना 1967 पूर्वीचे महसुली पुरावे ग्राह्य धरण्यात येत आहेत. त्याची पडताळणी देखील करण्यात येत आहे. त्यात गाव नमुना क्रमांक 14 ज्यात जन्म मृत्यूची नोंद आढळून येते. एखाद्याचा जन्म किंवा मृत्यू कुणबी म्हणून नमूद करण्यात आला असेल तर अशांना हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
शाळा सोडल्याचा दाखला, कडई पत्रक तसेच जुन्या फेरफारमधील नोंदीत एका कुणब्याने दुसऱ्या कुणब्याला जमीन विक्री केली असा उल्लेख असल्यावरही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सात-बारा उताऱ्यामध्ये उतरंडीनुसार कुणबी वंशावळ लागलेले असल्यासही असे प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.





