मुंबई : धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. त्याचबरोबर या प्रकरणापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती, या प्रकरणानंतर अनेकांना संताप व्यक्त केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास तीन महिने होत आले आहेत. मात्र, या प्रकरणातील कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झाली, असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. तसेच त्यांनी संतोष देशमुख यांच्या व्हायरल फोटोवर भाष्य करताना संताप व्यक्त केला. ते फोटो बघून संतोष देशमुख यांच्या मुलांना काय वाटेल? असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. आव्हाड म्हणाले, तुम्ही माझी आधीची भाषण काढून बघा. या सर्व फोटोंचं वर्णन माझ्या भाषणामध्ये आहे. संतोष देशमुख जेव्हा अंतिम घटका मोजत होते, तेव्हा मारणारे नालायक, नराधम, जल्लाद त्यांच्यावरती लघुशंका करत होते. तेव्हा लोकांनी आमची टिंगल टवाळी केली. माणसाच्या अंगात इतका क्रूरपणा इथे कुठून आला, आपल्याला सुद्धा एक बहीण आहे, बाप आहे, भाऊ आहे, मुले आहेत, आपण सर्व संसाराच्या लपेटात असताना आपल्या प्रेमाचा झरा आहे कुठे? हृदय कुठे आहे? असा सवालही आव्हाड यांनी केला.