Koynanagar | पाटणमध्ये महापूराचा कहर ; शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

प्रभात वृत्तसेवा
कोयनानगर – मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे पाटण तालुक्यातील हेळवाक येथे महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. गावात पाणी शिरल्याने शेतकरी आणि व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले असून, कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
या पूरग्रस्तांना आणि शेतकर्यांना शासनाकडून तात्काळ मदत देण्याचे आश्वासन पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील पाटण, हेळवाक येथील पूर स्थिती आणि पाबळ नाल्याजवळ खचलेल्या कोयना-नवजा रस्त्याची पाहणी करून, परिस्थितीचा आढावा घेतला.
पाटणमधील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांचीही त्यांनी भेट घेऊन, दिलासा दिला. पूरग्रस्तांना निवार्यासह सर्व सोयी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्थलांतरितांना जेवण, अंथरूण, पांघरूण, चहा, नाश्ता वेळेवर मिळत असल्याची, पिण्याचे पाणी विद्युत व्यवस्थेचीही चौकशी पालकमंत्र्यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, पोलीस उपअधीक्षक विजय पाटील, कार्यकारी अभियंता महेश रासनकर, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कोयना-नवजा रस्ता खचल्याने, पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करून सुरू करावा. या ठिकाणी दोन संरक्षण भिंती उभारण्याची कामे त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.





