Koynanagar News: पाटणकर गटाला जबर धक्का! कोयना पट्ट्यातील ‘या’ गावानं अचानक का बदलला निर्णय?

प्रभात वृत्तसेवा
कोयनानगर – कोयना भागातील शिवंदेश्वर (दाबाचा माळ) येथील पाटणकर गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईत ‘मेघदूत’ या आपल्या शासकीय निवासस्थानी या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा प्रभाव वाढत असून, शिवसेनेत प्रवेशाची मालिका सुरुच आहे.
कोयना भागातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे ढवळून निघाले असून पाटणकर गटाला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. विकासकामांची गती, निर्णयक्षम नेतृत्व, पारदर्शक प्रशासन आणि जनतेशी थेट संपर्क या कारणांमुळे मंत्री देसाई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोणत्याही दबावाखाली हा प्रवेश केला नसून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
जयेश थोरावडे, अमोल जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव, अनिल जाधव, रोहन सपकाळ, चंद्रकांत कांबळे, वसंत कांबळे आणि चंद्रकला जाधव यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्री देसाई म्हणाले, शिवसेना केवळ राजकीय पक्ष नसून, जनतेच्या प्रश्नांसाठी कार्य करणारी चळवळ आहे. पाटण तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल.





