Koynanagar News : ओझर्डे धबधबा परिसरात मंगळवारी दुपारी शासकीय कामानिमित्त गेलेल्या महसूल विभागातील तलाठी अजय जाधव यांच्यावर रानगव्याने अचानक हल्ला चढविला. क्षणार्धात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जाधव नियमित महसुली कामासाठी ओझर्डे परिसरात गेले होते. परिसर शांत असताना झुडपातून अचानक बाहेर पडलेल्या रानगव्याने जोरदार धडक देत त्यांना खाली पाडले. या धडकेत त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून शरीरावरही जखमा झाल्या आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी जाधव यांना त्वरित मानाईनगर उपकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून जखमांवर मलमपट्टी केली. दोन्ही पायांना सूज व तीव्र वेदना असून पुढील तपासणी सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ओझर्डे धबधबा हा पर्यटकांचा आणि स्थानिकांचा आवडता निसर्ग पर्यटनस्थळ आहे. मात्र, अलीकडील काळात या भागात बिबट्या, रानगवा तसेच अन्य वन्यप्राण्यांची वाढती वर्दळ चिंतेचा विषय ठरत आहे. वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून गस्त वाढवावी, सूचना फलक उभारावेत आणि प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बिबट्या, रानगवा व अन्य वन्यप्राणी वारंवार मानवी वसाहतीत येत असून थेट जनतेवर हल्ले करत आहेत. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. केवळ बैठका आणि आश्वासने पुरेशी ठरणार नाहीत. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी ठोस नियोजन, तातडीची कृती आणि कठोर अंमलबजावणी अपरिहार्य ठरणार आहे. अन्यथा पुढील दुर्घटनेची जबाबदारी प्रशासनालाच घ्यावी लागेल, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे.