Koyna Dam : महाराष्ट्राला मोठा दिलासा: कोयना धरण 100 टक्के भरले; दोन दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू
कोयना धरणाने गुरुवारी (ता. ३) सायंकाळी पाच वाजता १०५.२५ टीएमसी म्हणजेच १०० टक्के पाणीसाठ्याची पातळी गाठली. कोयना धरण (Koyna Dam) पूर्ण क्षमतेने भरले ही राज्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी आहे.

Koyna Dam : कोयना धरणाने गुरुवारी (ता. ३) सायंकाळी पाच वाजता १०५.२५ टीएमसी म्हणजेच १०० टक्के पाणीसाठ्याची पातळी गाठली. कोयना धरण (Koyna Dam) पूर्ण क्षमतेने भरले ही राज्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी आहे.
धरणाची पाणीपातळी २१६३ फूट ६ इंच (६५९.४३५ मीटर) झाली असून, जिवंत पाणीसाठा १००.१३ टीएमसीवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात ७७३७ क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, दिवसभरात सुमारे ०.२५ टीएमसी पाण्याची भर पडली.
धरण पूर्ण भरल्याने अतिरिक्त पाण्याचे नियमन सुरू करण्यात आले आहे. धरणाच्या सहा वक्र दरवाजांपैकी दोन दरवाजे प्रत्येकी एक फूट उचलण्यात आले असून, त्यातून कोयना नदीपात्रात ४२३२ क्युसेक्स पाण्याचा (Koyna Dam) विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील आवक लक्षात घेऊन विसर्गाचे प्रमाण बदलण्याची शक्यता आहे. जूनमधील कोरडेपणापासून १०५.२५ टीएमसीच्या जलसाठ्यापर्यंतचा हा प्रवास निसर्गाच्या अनिश्चिततेचे चित्र स्पष्ट करणारा ठरला आहे.
कोयना धरण पूर्ण भरल्याने सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात समाधानाचे वातावरण आहे. शेतकरी आणि उद्योगविश्वाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. शेती, औद्योगिक वापर आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी हा साठा दिलासादायक ठरणार आहे. दरम्यान, धरणातून विसर्ग सुरू झाल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी दक्षता घ्यावी.
नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठच्या धोकादायक भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्राम प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनीही संभाव्य पाणीवाढीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक (Koyna Dam) खबरदारी घेण्याची गरज आहे. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे १ मिलिमीटर, तर एकूण ४१९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नवजा येथे २ मिलिमीटर आजचा, तर ५३८५ मिलिमीटर एकूण पाऊस झाला आहे. महाबळेश्वर येथे आतापर्यंत ५०४९ मिलिमीटर पावसाची नोंद आहे.
धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आता पाण्याची आवक आणि विसर्ग यांचा समतोल राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन पुढील विसर्गाचे नियोजन केले जाणार असून, त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांचे लक्ष आता धरण व्यवस्थापनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.






