Satara: कासच्या फुलोत्सवाचा शानदार शुभारंभ! पर्यावरण जपत शाश्वत पर्यटनाला चालना द्या : उदयनराजे
Satara देश- विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कासच्या पर्यटन हंगामाला सुरुवात होताच पठारावर निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढण्यास सुरुवात झाली आहे.

Satara: जागतिक वारसा लाभलेल्या कास पठारावर फुलांच्या विविधरंगी उधळणीचा बहुप्रतीक्षित कास फुलोत्सव हंगामाचा शानदार शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात झाला. खासदार उदयनराजे भोसले यांनी फित कापून या फुलोत्सवाचे उद्घाटन केले. पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधांसह कास परिसराचा शाश्वत निसर्ग टिकून राहिला पाहिजे यासाठी पर्यटकांनी पर्यटन करताना जबाबदारीने वागावे, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.
देश- विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कासच्या पर्यटन हंगामाला सुरुवात होताच पठारावर निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढण्यास सुरुवात झाली आहे. वन विभाग, सातारा वन परिक्षेत्र सातारा- मेढा आणि कास पठार कार्यकारी समितीच्यावतीने आयोजित उद्घाटन सोहळ्यास खासदार उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “कास पठार ही केवळ साताऱ्याची पर्यटनाची ओळख नाही, तर आपल्या समृद्ध नैसर्गिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. पावसाळ्यानंतर फुलांच्या विविध रंगांनी सजलेले कासचे पठार पाहण्यासाठी देश- विदेशातून पर्यटक येथे येतात. या पर्यटनामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळते.”
पर्यटनवाढीच्या नावाखाली कासच्या नाजूक पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले. “कासचा निसर्ग केवळ पाहण्याचा विषय नाही, तर तो पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे. वन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून पर्यटकांनी कासची जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवावे,” असे आवाहन त्यांनी केले. कासचा निसर्ग, जैवविविधता, स्थानिकांचा वारसा आणि पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी यांचा समतोल साधत पर्यावरणपूरक व शाश्वत पर्यटनाला चालना मिळणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी भाजप सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर, रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपाळे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक व पर्यटक उपस्थित होते.





