Satara: पवित्र पोर्टलमधून जिल्ह्यात 357 जण होणार शिक्षक
Satara नियुक्तीमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कागदपत्र पडताळणी समिती स्थापन केली असून, निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी या समितीमार्फत करण्यात येत आहे.

Satara: सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील रिक्त शिक्षकपदांपैकी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी 520 पदांचा अहवाल भरण्यात आला होता. त्यापैकी 357 शिक्षकांच्या नियुक्तीसाठी निवडयादी प्राप्त झाली असून, संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नियुक्तीमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कागदपत्र पडताळणी समिती स्थापन केली असून, निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी या समितीमार्फत करण्यात येत आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांना 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने गावांची निवड करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार व समानीकरणाच्या निकषांचा विचार करुन, शिक्षकांना शाळांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळा वाटप करताना प्रत्येक तालुक्याचा समतोल राखण्याचा आणि ज्या ठिकाणी अधिक आवश्यकता आहे, त्या ठिकाणी योग्य प्रमाणात शिक्षक उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. आता या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरली जाणार असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये अधिक शिक्षक उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील असून, शिक्षकांची रिक्त पदे भरणे हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण समितीच्या सभापती सौ. तेजस्विनी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी सांगितले.
या शिक्षक भरतीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागून, प्रत्येक तालुक्यात शिक्षकांची गरज आणि उपलब्धता यामध्ये समतोल साधला जाईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पवित्र पोर्टलद्वारे 357 शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रियेमुळे अनेक शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होईल. शाळा वाटप करताना तालुक्यांचा समतोल राखून आणि शिक्षकांची गरज लक्षात घेऊन, प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. शिक्षक उपलब्ध झाल्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल घडून येईल.





