Koyananagar | कोयनानगरमध्ये अवतरणार ‘कोयना गार्डन’ ; पर्यटन विभागाचा आराखडा तयार

प्रभात वृत्तसेवा
कोयनानगर ( विजय लाड ) – महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर कोयना धरण परिसराला नवा आयाम देणारा प्रकल्प आकार घेत आहे. राज्याचे पर्यटन व पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून कोयनानगर येथे अत्याधुनिक सुविधांनी नटलेले ‘कोयना गार्डन’ साकारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी पर्यटन विभागाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला राज्य शासनाची तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.
निसर्गरम्य कोयना परिसराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या गार्डनमध्ये पर्यटकांना आधुनिक आणि अनोख्या सुविधा अनुभवता येणार आहेत. यात थ्रीडी रेंडरिंग एन्ट्रान्स गेटवे, थ्रीडी रेंडरिंग पाथवे, विविध माईंड ध्यानमुद्रा, ग्लास स्काय वॉक, वॉटर इन व्हेरिअस फॉर्म्स, होलोग्राफिक प्रोजेक्शन जिओडेसिक डोम, आकर्षक फूड कोर्ट, बेस्ट सिटिंग एरिया, आधुनिक बेंचेस व टॉयलेट ब्लॉक, वे फाइंडर व लोकेशन प्लॅन, तसेच हवामानाचा आनंद घेण्यासाठी कव्हर्ड सिटिंग एरिया यांचा समावेश आहे.
पर्यटकांना दिवसभर रममाण होण्यासाठी या गार्डनमध्ये विविध कलात्मक स्थापत्य, फुलझाडांचे सजावटी ताटवे, प्रकाशयोजना, जलप्रवाह व धबधबे यांचा समावेश असेल. रात्रीच्या वेळी विशेष लाईट शो आणि होलोग्राफिक प्रोजेक्शनमुळे हा परिसर जादुई रुप धारण करणार आहे. या गार्डनमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर स्थानिक रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. छोटे व्यवसाय, हॉटेल्स, होम स्टे, टॅक्सी सेवा आणि स्थानिक हस्तकलेच्या विक्रीत वाढ होईल, असा अंदाज आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये या प्रकल्पाबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.
पर्यटनाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या शंभूराज देसाई यांच्या या उपक्रमामुळे कोयनानगरचा नवा चेहरा पाहयला मिळणार आहे. कोयना धरण, वन्यजीव, डोंगररांगा आणि आता ‘कोयना गार्डन’ यामुळे कोयना परिसर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पर्यटनस्थळ म्हणून देशभरात प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे.





