Koregaon Railway Station : पेट्रोल पंपाजवळच भीषण आग; एका चुकीमुळे रेल्वे स्टेशन परिसर हादरला
Koregaon Railway Station : बाचल पेट्रोल पंप अवघ्या काही अंतरावर असताना लागली आग; स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली.

Koregaon Railway Station – सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गालगत कोरेगाव रेल्वे स्टेशनसमोर सोमवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या दरम्यान वांगणा नदीकाठी काही युवकांनी तांबे काढण्यासाठी इलेक्ट्रिक वायर जाळल्याने झाडाझुडपांना मोठ्या प्रमाणावर आग लागल्याची घटना घडली. वेगाने पसरलेल्या आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनसमोर प्रख्यात उद्योगपतीचा रिकामा प्लॉट असून त्याच्या मागील बाजूस वांगणा नदीकाठी हा प्रकार घडला.
काही युवकांच्या वायर जाळण्याच्या निष्काळजीपणामुळे आगीने वेग घेत शेजारील मोकळ्या जागेतील झाडाझुडपांना वेढा घातला आणि पुढे महामार्गालगतच्या वडाच्या झाडापर्यंत आग पोहोचली. दरम्यान, या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सातारा जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री व बाचल पेट्रोलियमचे मालक अविनाश बाचल यांना माहिती दिली. त्यांनी त्वरित सातारा नगरपालिका तसेच सातारा औद्योगिक वसाहतीतील कूपर कार्पोरेशनच्या अग्निशामक दलाला पाचारण केले.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी कोरेगाव पोलीस ठाण्यातील हवालदार विक्रांत लावंड व संदीप माने यांनीही धाडसाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिकांच्या मदतीने आणि अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग आटोक्यात आली.
युवकांवर कारवाई करण्याची मागणी
विशेष म्हणजे, आग लागलेल्या ठिकाणापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर बाचल पेट्रोलियम हा पेट्रोल पंप असून तेथे मोठ्या प्रमाणावर इंधन साठा आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, वेळीच उपाययोजना करण्यात आल्याने संभाव्य अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. या प्रकारास जबाबदार असलेल्या युवकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.





