खोट, खोट बोलायचं नाही.. कॉपी करायची नाही.! कोल्हापुरी चप्पलेची परदेशी ब्रँडकडून नक्कल, भारताचे लोक भडकले

Kolhapuri Chappal | Prada | Milan Fashion Week : फॅशन जगतात रस असलेले लोक फॅशन शोची आतुरतेने वाट पाहतात. ज्यांना फॅशन शोबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी हा एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये मोठ्या डिझायनर कंपन्या त्यांच्या पुढील हंगामासाठीचे डिझाइन लाँच करतात.
यामध्ये कंपनी त्यांचे आगामी प्रकारचे, रंग, पोत (फॅब्रिक), डिझाइनचे कपडे किंवा अॅक्सेसरीज याबद्दल माहिती देते. इटलीतील मिलान येथे असाच एक शो चालू होता. ‘स्प्रिंग-समर 2026’ असं शोमध्ये असं याच नाव होत. हा शो खास करून पुरुषांच्या कपड्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ब्रँडेड कंपन्यांनी बनवलेले कपडे, बॅग्ज, पादत्राणे, अॅक्सेसरीज घालून मॉडेल्स रॅम्पवर त्यांच्या स्टाईलचा अभिमान बाळगत चालत होत्या. त्याचवेळी फॅशन जगतातील चाहते रॅम्पच्या बाजूला बसून टाळ्या वाजवत होते. पण यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे सगळीकडेच या फॅशन वीकची चर्चा रंगू लागली.
खरं तर, लक्झरी वस्तूंची कंपनी ‘प्राडा’ देखील या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कंपनीच्या वस्तू लाखो आणि कोटींमध्ये विकल्या जातात. इतर कंपन्यांप्रमाणे, ती देखील त्यांचे उन्हाळी कलेक्शन सादर करत होती. मॉडेलने आधुनिक डिझाइनचे कपडे, हातात डिझायनर बॅग आणि पायात कोल्हापुरी चप्पल घातलेली होती.
View this post on Instagram
हो, तीच कोल्हापुरी चप्पल ज्यासाठी असे म्हटले जाते की, ते कधीही तुटत नाहीत किंवा फाटत नाहीत आणि 100% नैसर्गिक चामड्यापासून बनवलेली असते. फॅशन शो फॉलो करणाऱ्यांनी लगेचच या चप्पल ओळखल्या. यानंतर, कोल्हापुरी चप्पल घातलेल्या मॉडेल्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर होऊ लागले आणि एका नवीन वादाला तोंड फुटले.
सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफ अदाजानिया यांनी या शोचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, ‘हे आमचे जुनी कोल्हापुरी चप्पल आहे. डाएट साब्यानेही त्यांच्या इंस्टाग्रामवर म्हटले आहे की आता आम्ही युरोपमध्ये फॅशन म्हणून विकल्या जाणाऱ्या £१००० किंमतीच्या प्राडा कोल्हापुरी चप्पलसाठी तयार आहात का?’ (भारतीय रुपयांमध्ये सुमारे 1 लाख रुपये) अशी पोस्ट शेअर केली आहे.
त्यानंतर काही युजरने म्हटले की हे लोक भारतीय संस्कृती आणि फॅशनने प्रेरित होत असतील पण ते कधीही हे मान्य करणार नाहीत की त्यांनी भारतीयांकडून प्रेरणा घेतली आहे. लोक संतापले आहेत कारण हे पहिल्यांदाच घडलेले नाही. त्यामुळे आता नेटकरी ‘प्राडा’ला ‘चप्पल चोर’ म्हणून चांगलंच ट्रोल करत आहेत. तसेच राज्यातील अनेक नेते मंडळींनी देखील सोशल मीडियावर या घटनेचा निषेध केला आहे. आणि ‘प्राडा’ला चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून येत आहे.
कोल्हापूरच्या कारागिरांची नाराजी :
चप्पल बनवणाऱ्या एका समूहाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्राडाविरुद्ध तक्रार दाखल केली आणि प्राडाच्या या कृतीवर तीव्र नापसंती दर्शवली. त्यांनी म्हटले की प्राडा भारतीय संस्कृतीचे शोषण करत आहे आणि स्थानिक कारागिरांना यामुळे पैशाचे नुकसान होत आहे. अशा परिस्थिती, कारागिरांनी या संदर्भात योग्य कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी उठवला आवाज :
या विरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आवाज उठवला आहे. ‘प्राडा’ नामक विदेशी फॅशन ब्रँडने नुकतीच कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून ती स्वतःच्या नावाने बाजारात आणली आहे. या कंपनीने कोल्हापूरी चप्पलचा उगम, इतिहास, कोल्हापूर भागातील कारागिरांची कौशल्यपूर्ण कला, किंवा भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा उल्लेखही केलेला नाही. ही गोष्ट केवळ डिझाईन कॉपी नाही, ही कोल्हापूरच्या समृद्ध वारशाची व शेकडो वर्षे हा वारसा जपणाऱ्या कारागिरांची फसवणूक आहे.
राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी या कलेला व कारागिरांना राजाश्रय देऊन कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायाला भरभराट मिळवून दिली. कोल्हापूरी चप्पल हे केवळ फॅशन स्टेटमेंट नसून, शेकडो वर्षांची कारागिरी, कौशल्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.
कोल्हापूरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असताना त्यासोबत त्या चपलेची मूळ ओळख देखील पोहोचावी, शेकडो वर्षे ही कला ज्यांनी जोपासली, टिकवली, वाढवली व विकसित केली त्या कारागीरांना त्याचा योग्य मोबदला मिळावा, त्या कलाकृती मागील संस्कृती, वारसा व परंपरेची देखील जगाला ओळख व्हावी, यासाठी कोल्हापूरी चप्पलला २०१९ साली GI मानांकन मिळाले आहे.
या GI मानांकनाच्या अधीन राहून त्याचे सर्व नियम पाळत या कंपनीने कोल्हापुरी चपलेची विक्री केली असती तर कोल्हापुरी जगभरात पोहोचली म्हणून आंनदही व्यक्त केला असता, मात्र सरळसरळ डिझाईन कॉपी करून, चपलेची मूळ ओळख लपवून स्वतःच्या नावाने त्याची विक्री करणे हे कृत्य “सांस्कृतिक अपहार” (Cultural Appropriation) चे मोठे उदाहरण आहे.
सोशल मीडिया वर देखील देशभरातून यावर पडसाद उमटत आहेत, मात्र PRADA कंपनी कडून अद्याप कोणताही प्रतिसाद पाहायला मिळालेला नाही. कंपनीने आपली चूक वेळीच सुधारून कोल्हापुरीची अस्सल ओळख न लपविता कोल्हापुरी चप्पल बाजारात आणले तर आम्ही स्वागतच करू.
शेकडो – हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीची, कलाकृतींची अशी नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना योग्य वळण लावण्यासाठी भारत सरकारनेही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच ग्राहक म्हणून आपणही याविरुद्ध आवाज उठवून अशा कंपन्यांना वेळीच त्यांची चूक सुधारविण्यास भाग पाडले पाहिजे.
भारतीय संस्कृती व परंपरेशी जोडलेले कोणतेही अस्सल भारतीय उत्पादन जागतिक स्तरावर जात असताना त्याची मूळ ओळख टिकून रहावी व त्या उत्पादनासोबतच भारतीय संस्कृती व परंपरा देखील जागतिक स्तरावर पोहोचावी, हाच यामागचा उद्देश आहे.” या आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
कृष्णराज महाडिक यांनी घेतलं मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट :
तसेच, भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबद्दल पत्र सुपूर्द केले आहे. “२३ जून २०२५ रोजी मिलान, इटलीमध्ये झालेल्या फॅशन शोमध्ये Prada या आंतरराष्ट्रीय ब्रँडने अशी सॅंडल सादर केली, जी अक्षरशः आपल्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पलची हुबेहूब नक्कल होती.
ही डिझाईन आता विकली जात आहे ₹1.1 ते ₹1.2 लाखांमध्ये, पण ज्या हातांनी ही चप्पल जगासमोर आणली – त्या स्थानिक कारागिरांना ना सन्मान, ना हक्क! ही अन्यायकारक गोष्ट आता थांबायलाच हवी. आणि म्हणूनच, कोल्हापूरच्या भूमीतून निर्माण झालेले तरुण नेतृत्वाचे प्रतीक, लोकांच्या हक्कासाठी नेहमी पुढे असणारे कृष्णराज महाडिक यांनी तात्काळ पुढाकार घेतला.
त्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन, हा संपूर्ण प्रकार अधिकृतपणे सरकारपुढे मांडला. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत एक स्थानिक कोल्हापुरी चप्पल कारागीर देखील उपस्थित होते, कारण कृष्णराज महाडिक नेहमी मानतात – जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवल्याशिवाय नेतृत्वाला अर्थ नाही. त्यांच्या या संवेदनशील आणि ठाम भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
कोल्हापूरच्या परंपरेला आवाज देणारे, युवा पिढीचे खरे प्रतिनिधी म्हणून ते आज नावारूपाला आले आहेत. फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली आणि आश्वासन दिलं – “या प्रकरणात योग्य ती कठोर कारवाई केली जाईल.” आजचा दिवस हा केवळ आवाज उठवण्याचा नव्हता, तो होता आपल्या मातीसाठी, आपल्या कलाकारांसाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी लढण्याचा. कोल्हापुरी चप्पलवर हक्क आमचा आहे, आणि तो हक्क कुणालाही बिनधास्त घेऊ देणार नाही.”
कोल्हापुरी चप्पलची वैशिष्ट्ये काय?
– कोल्हापुरी चप्पल पूर्णपणे हाताने बनवली जाते. यात खिळ्यांचा वापर केला जात नाही; चामड्याचे तुकडे हाताने शिवले जातात.
– ती वानस्पतिक रंगांचा वापर करून टॅन केलेल्या चामड्यापासून तयार केली जाते, ज्यामुळे ती पर्यावरणपूरक आणि टिकाऊ ठरते.
– ही चप्पल ओपन-टो आणि टी-स्ट्रॅप शैलीत बनवली जाते, ज्यामुळे ती आरामदायी आणि हवेशीर राहते.
– यात नक्षीकाम, ब्रेडिंग, आणि कधीकधी आवाज किंवा इतर सजावटीचे घटक असतात, ज्यामुळे ती आकर्षक दिसते.
– पारंपारिक डिझाइन्ससोबतच आता आधुनिक आणि डिझायनर आवृत्त्याही उपलब्ध आहेत, ज्या सण, समारंभ, कॅज्युअल किंवा पार्टी वेअरसाठी योग्य आहेत.
– कोल्हापुरी चप्पल चामड्याच्या मजबूत सोलमुळे अत्यंत टिकाऊ असते.
– कोल्हापुरी चप्पल पुरुष, महिला, आणि मुलांसाठी उपलब्ध आहे. ती विविध रंगांत (उदा., तपकिरी, काळा, लाल, पिवळा) आणि डिझाइन्समध्ये मिळते.
– तुम्ही ही चप्पल पारंपारिक कुर्ता-पायजमा, जीन्स, किंवा साडी-लहेंग्यासोबत वेअर करू शकता, ती तुम्हाला खूपच स्टाईलिश लूक देते.
सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व :
कोल्हापुरी चप्पल 12व्या शतकापासून अस्तित्वात आहे. कोल्हापूरचे राजा बीज्जल आणि त्यांचे पंतप्रधान बसवन्ना यांनी स्थानिक चर्मकारांना प्रोत्साहन दिल्याने याची निर्मिती वाढली. यापूर्वी या चप्पलांना कापशी, पायटण, कचकडी, बक्कलनाळी अशी नावे होती, जी त्या बनवल्या जाणाऱ्या गावांवरून पडली होती. कोल्हापूरचे शाहू महाराज आणि राजाराम II यांच्या काळात 29 चर्म संस्करण केंद्रे उघडली गेली, ज्याने या उद्योगाला चालना मिळाली.
कोल्हापुरीला मिळाला ‘GI’ टॅग :
दरम्यान, कोल्हापुरी चप्पल भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहेत. उच्च दर्जाच्या चामड्यापासून बनवलेले, हे चप्पल कुशल कारागिरांनी बनवले आहेत. त्यांची रचना केवळ टिकाऊच नाही तर घालण्यासही खूप आरामदायक आहे. आणि म्हणीन 2019 मध्ये, त्यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला, जो त्यांचे जागतिक महत्त्व दर्शवितो.





