Kolhapur : वाघीण ठरली सह्याद्रीतील ‘व्याघ्र वंशवृद्धीची जननी’
कोल्हापूर – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाची वाघीण जिचे नाव एसकेटी ०२ आहे. ही गेल्या दशकभरात संपूर्ण सह्याद्री-कोकण पट्ट्यातील वाघांच्या वंशवृद्धीचा पाया बनली आहे. तिच्या पिल्लांनी आणि नातवंडांनी आता स्वतंत्र अधिवास तयार केला असून, ही वाघीण सह्याद्रीची जननी म्हणून ओळखली जात आहे.
या वाघिणीचे पहिले कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे दर्शन २०१४ साली वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट (डब्ल्यूसीटी) टीमने घेतले. तिने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये पिल्लांना जन्म दिला असल्याची नोंद आहे. तिच्या पिल्लांपैकी एसकेटी ०४ आणि एसकेटी ०७ या माद्या आता प्रौढ झाल्या असून, यातील पहिली मादी २०२४ मध्ये तीन पिल्लांसह सह्याद्रीच्या जंगलात दिसून आली तर दुसरी मादी २०२१ मध्ये गोव्यातील म्हादाई अभयारण्यात आढळली.
एसकेटी ०२ही वाघीण २०२३ मध्ये ती पुन्हा गर्भवती असल्याचे संकेत मिळाले, मात्र त्यानंतर पिल्लांची नोंद झाली नाही. आज ती सुमारे १५ वर्षांची असून, सह्याद्रीच्या जंगलात आजही मुक्तपणे वावरते आहे.
वाघीण आणि तिची पिढी सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनाचे यश दर्शवते. व्याघ्र पुनर्स्थापना, शाकाहारी प्राण्यांचे पुनर्वसन, आणि लँडस्केपस्तरीय व्यवस्थापन ही पुढील धोरणात्मक पावले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम घाटात व्याघ्र पुनरुज्जीवनाचा आदर्श ठरत आहे.
सह्याद्री-कोकण–काली वाघ संचार मार्ग आणि लँडस्केपस्तरीय धोरण :
– सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा तिलारी, राधानगरी, चांदोली, कोयना आणि कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प यांना जोडणाऱ्या संचार मार्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे.
– या कॉरिडॉरमध्ये सुमारे ३२ वाघ असून, त्यापैकी १४ वाघ महाराष्ट्रातील सह्याद्री परिसरात आहेत.
– क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व्याघ्र संवर्धनाची व्याप्ती आता संपूर्ण लँडस्केपवर वाढवण्यात आली आहे, ज्यामध्ये राधानगरी अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे.
– सह्याद्री फाउंडेशनचा कार्यक्षेत्र विस्तार करून, संपूर्ण लँडस्केपमध्ये भागीदारी आधारित आणि विज्ञानाधिष्ठित वन्यजीव संरक्षण धोरण राबवले जात आहे.





