Kapil Dev reality check on India batting : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-२ अशा दारुण पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे सध्या क्रिकेट समीक्षकांच्या निशाण्यावर आहेत. सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी गंभीर यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याचदरम्यान, १९८३ चे विश्वचषक विजेते माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीतील त्रुटींवर बोट ठेवून ‘रियालिटी चेक’ दिला आहे. कपिल देव यांचा स्पष्ट सल्ला – स्पोर्टस्टारशी बोलताना कपिल देव म्हणाले, “आपण टी-२० आणि वनडेमध्ये जास्त व्यस्त असतो, याचा अर्थ फलंदाजांना फार क्वचितच गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांचा सामना करावा लागतो. स्पिन आणि सीम गोलंदाजीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर पुढे जाण्यासाठी तुम्हाला संयम आणि वेगळ्या प्रकारच्या कौशल्याची गरज असते.” कपिल देव यांनी सध्याच्या फलंदाजांवर थेट टीका केली. ते म्हणाले, “तुमच्याकडे राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे फलंदाज नाहीत, ज्यांना विकेटवर टिकून राहायचे माहीत होते. कसोटीतील फलंदाजीचा अर्थ विकेटवर टिकून राहणे आहे.” कपिल देव यांच्याकडून ऋषभ पंतचा बचाव – वेगवान गोलंदाजी खेळण्याऐवजी फिरकी गोलंदाजी हाताळण्यासाठी चांगल्या कौशल्याची गरज असते, असे कपिल देव यांनी सांगितले. मात्र, त्यांनी फलंदाज ऋषभ पंतचा बचाव केला. “जर तुमचा स्वभाव ऋषभ पंतसारखा जाऊन हिट करण्याचा असेल, तर ते वेगळे आहे. तुम्ही पंतला बचाव करण्यास सांगू शकत नाही. तो खरा मॅच-विनर आहे. तो २० धावा काढण्यासाठी १०० चेंडू खेळणार नाही. तो जेव्हा षटकार मारतो, तेव्हा आपण सर्वजण आनंदित होतो. तो प्रतिस्पर्धी संघाला उद्ध्वस्त करू शकतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले. हेही वाचा – Jay Shah Award : महिला क्रिकेटला नवी दिशा देणारे जय शाह ‘उत्कृष्ट कामगिरी’ पुरस्काराने सन्मानित गंभीर यांच्या नेतृत्वाखालील प्रदर्शन गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आतापर्यंत सहा कसोटी मालिका खेळल्या आहेत. वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्धचा विजय वगळता, भारताला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर क्लीन स्वीपचा सामना करावा लागला आहे. गंभीर यांच्या कार्यकाळात भारताला घरच्या मैदानावर क्लीन स्वीप होण्याची ही दुसरी वेळ आहे, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर टीका होत आहे.