किरण गोसावीची दिवाळी तुरुंगातच; पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ

पुणे – आर्यन खान प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावी याच्या पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी त्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. शिवाजी नगर कोर्टाने आज त्याच्या कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे किरण गोसावीची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.
गोसावीला देण्यात आलेली आठ दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. त्यामुळे त्याला शिवाजीनगर कोर्टात त्याला हजर करण्यात आलं होतं. गोसावीने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने त्यात फॉरेन्सिक रिपोर्टची गरज असल्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाने गोसावीची अजून 3 दिवसाची म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या 4 गुन्ह्यांसह राज्यातील इतर भागातही गोसावीवर 5 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासोबत आणखी काही जण असून त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार गोसावीच्या पोलीस कोठडीत 8 तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.





