Dhananjay Munde : “संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी” – धनंजय मुंडे

Dhananjay Munde – संतोष देशमुख हा माझ्या जिल्ह्यातील सरपंच होता. त्याच्या हत्येचे आपल्यालाही दु:ख आहे. मात्र या प्रकरणात राजकारण केले जात आहे. त्यातूनच आपले नाव पुढे केले जात आहे. पण या प्रकरणाशी आपला काहीएक संबंध नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी आपण पहिल्या दिवसापासून करत आहोत, अशी भूमिका मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडली.
धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर सह्याद्री अतिथीगृहात त्यांच्या विभागाची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांबरोबर बोलत होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून बीडसह राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. वाल्मिक कराड यामागे असल्याचा आरोप करून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना शासन झालं पाहिजे. तसेच, आरोपींना फाशी झाली पाहिजे, या मताचा मी पहिल्या दिवसापासून आहे. संतोष देशमुख हा माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच होता. यात जो कुणी गुन्हेगार आहे, मग तो कुणीही असो, कुणाच्याही जवळचा असो, अगदी माझ्याही जवळचा असला तरी त्याला सोडू नका.
मात्र, राजकारणापोटी माझ्यावर आरोप केले जातात. यामागचं राजकारण सगळ्यांना माहिती आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे होते. पण, कराड हे माझ्याही जवळचे आहेत. कराडवर दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी पोलीस करत आहेत. चौकशी पारदर्शीपणाने झाली पाहिजे, या मताचा मी आहे. त्यामुळे शासन कुणालाही पाठीशी घालत नाही, असेही त्यांनी सांगितले.





