धक्कादायक…! अपहरण करून दारू पाजली, नंतर ७ तास डांबून अमानुष मारहाण; बीडमध्ये गुंडाराज सुरूच

बीड : बीडमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता बीडमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच,आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अपहरण करून तरुणाला दारू पाजली,तसेच त्याला तब्बल सात तास डांबून ठेऊन अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे.
ही घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अमानुष मारहाणीत आप्पा काशिनाथ राठोड हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा बीड हादरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्रुड येथील आप्पा काशिनाथ राठोड या तरुणाचे रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अपहरण करण्यात आले. रमेश पवार आणि इतर पाच ते सहा व्यक्तींनी त्याचे अपहरण केले. अपहरणानंतर त्याला मोठ्या प्रमाणात दारू पाजण्यात आली. त्यानंतर त्याला तब्बल सात तास डांबून अमानुषपणे मारहाण केली. आरोपींनी तब्बल सात तास मारहाण केल्यानंतर सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या तरुणाला सोडून दिलं.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत आप्पा राठोड यांना रुग्णालयातदाखल करण्यात आले. बीड येथील जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या तरुणाच्या डोक्याला सात टाके पडले असून, शरीरावर मारलयाचे लालभडक रंगाचे व्रण उमटले आहेत. माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी माहिती दिली असून, अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती माध्यमांना आप्पा राठोड यांनी दिली आहे.
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे आप्पा राठोड या तरुणाच्या ओळखीच्या व्यक्तीनेच त्याचे अपरहण केले होते. चहा पाजतो असे म्हणत, दुचाकीवर बसवून त्याचे अपरहण केले. आणि अमानुष मारहाण केली. अप्पासाहेब हे गोरसेना संघटनेत सक्रिय आहे. ते समनक संघटनेचे पदाधिकारी आहे. आप्पाचे अपहरण केलेल्या रमेश पवार या व्यक्तीने भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे आप्पाने त्याला पद देण्यास नकार दिला होता. याचाच राग मनात धरून त्यांच्यासोबत हे भयानक कृत्य करण्यात आले आहे.





